सिंधुदुर्गातील रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरमध्ये प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा : ‘ब्लॅक फंगस’वर ही प्रभावी!
पत्रकार परिषदेत करण्यात आलेले दावे
- ‘हाय रिक्स’मधील 50 रुग्णांवर ‘मिथिलिन ब्लू’चा प्रयोग 100 टक्के यशस्वी
- सर्वच्या सर्व रुग्णांचे वाचले प्राण, अल्प दरात औषध होऊ शकते उपलब्ध
- पहिल्या लाटेत काही राज्यात व अन्य देशात औषधाचा झाला यशस्वी वापर
- ऑक्सिजनची गरजही कमी करते हे ‘मिथिलिन ब्लू’
प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
एकीकडे कोविडच्या महामारीत सिंधुदुर्गचा ‘डेथ रेट’ हा राज्यात पहिल्या क्रमांकावर जाऊन हा जिल्हा रेडझोनमध्ये गेल्याने सर्वत्र चिंतेचे सावट आहे. तर दुसरीकडे याच जिल्हय़ातील मालवण येथील ‘रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर’ मध्ये ‘मिथिलीन ब्लू’ या मान्यताप्राप्त औषधाचे प्रयोग कोरोना ट्रिटमेंटमध्ये केल्यानंतर त्याचे 100 टक्के चांगले रिझल्ट आल्याची अत्यंत सुखावणारी बाब पुढे आली आहे. प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. विवेक रेडकर यांनी जिल्हय़ातील नामवंत डॉक्टरांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासह ही बाब स्पष्ट केली.
या औषधाचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे या औषधाच्या वापराने रुग्णाला लागणाऱया ऑक्सिजनची गरज कमी होत असल्याने ऑक्सिजनची बचतही मोठय़ा प्रमाणावर होणार असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. तसेच अगदी सामान्यातील सामान्य रुग्णांच्या खिशाला परवडेल एवढय़ा अल्प दरात मुबलक प्रमाणात हे औषध उपलब्ध होऊ शकते, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
कुडाळ एमआयडीसी येथील विश्रामगृहावर मंगळवारी रोजी बोलावण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत डॉ. रेडकर यांनी कोरोनाच्या भीतीने गर्भगळीत झालेल्या जनतेला दिलासा दिला. ‘मिथिलीन ब्लू’ या औषधाची माहिती देताना डॉ. रेडकर म्हणाले, या औषधाचा शोध हा शंभर वर्षांपूर्वीच लागला आहे. हा शोध काही आम्ही लावलेला नसून या औषधाचा वापर कोरोनाच्या ट्रिटमेंटमध्ये करून रुग्णांचे प्राण शंभर टक्के वाचवता येऊ शकतात, हे आम्ही आमच्या रिसर्च सेंटरमध्ये सिद्ध केल्याचे ते म्हणाले. व्हेन्टिलेटर व ऑक्सिजनवर असलेल्या व 88 टक्केपेक्षा कमी ऑक्सिजन लेवल असलेल्या 50 रुग्णांवर या औषधाची चाचणी घेण्यात आली. हे पन्नासही रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरुपपणे बाहेर आल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व प्रयोगाच्या इत्यंभूत नोंदी सायंटिफिक पद्धतीने ठेवण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. असे प्रयोग केवळ आपल्याच रिसर्च सेंटरवर सुरू नसून कोरोनाच्या पहिल्या लाटेत भारतातील गुजरात व अन्य काही राज्यांबरोबरच इराण आणि इंग्लंडमध्येही या औषधाचे यशस्वी प्रयोग करण्यात आले. मात्र अजून या प्रयोगाच्या रॅन्डमाईज कंट्रोल ट्रायल उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. विख्यात फिजिशियन डॉ. दीपक गोलतकर, डॉ. जयदीप काकडिया, इराणमधील डॉ. आलमदारी, अमेरिकेतील डॉ. भारत भूषण, लंडनमधील डॉ. गोयल या नामवंत भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांनी या ‘मिथेलीन ब्लू’ या औषधाचा पहिल्या लाटेत यशस्वी प्रयोग केला. ही नामवंत डॉक्टर मंडळी या औषधाच्या यशस्वी वापरासाठी रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या माध्यमातून ‘रेड झोन’ मध्ये गेलेल्या सिंधुदुर्गला मदत करण्यासाठी पुढे आली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरमध्ये करण्यात आलेल्या या यशस्वी प्रयोगात डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, डॉ. बी. जे. शिंदे (रायगड), डॉ. बावसकर, डॉ. एम. के. इनामदार, डॉ. नवनित वाघवा यांचाही सिंहाचा वाटा असल्याचे डॉ. रेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘मिथिलीन ब्लू’ ची वैशिष्टे
- हे औषध 142 वर्षांपूर्वी संशोधित केलेले असून आजपर्यंत जगात एकही रुग्ण या औषधाची रिऍक्शन येऊन दगावलेला नाही. हे औषध एक वर्षाच्या मुलापासून ते 100 वर्षांच्या वृद्धापर्यंत कोणालाही देता येते.
- फक्त किडनीचे मोठे आजार, डायलेसीस घेणारे रुग्ण, गरोदर माता व मातेच्या दुधावर असलेल्या बाळांना, त्याचप्रमाणे लिव्हरचे मोठे आजार असलेल्या रुग्णांना हे औषध देता येणार नाही.
- कोरोना आजार होऊच नये म्हणून देखील आजार न झालेली माणसेही हे औषध घेऊ शकतात. हे औषध आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने घरी पण घेऊ शकतो. हे औषध दोनवेळा 2.5 एम. एल. जिभेखाली ठेवून नंतर पाच मिनिटांनी ते गिळणे व रोज रात्री नागपुडीत एक-एक थेंब सोडणे हे पथ्य कोविड महामारी काळात नियमितपणे पाळले तर अजिबात कोरोना होत नाही, असा दावा करण्यात आला.
- या औषधाची किंमत फक्त 125 रुपये आहे. रेमडेसिविरसारख्या इंजेक्शनला चार हजार रु. लागतात. ‘रेमडेसिविर’ हे औषध कोविड रुग्णाच्या फक्त शरीरातील व्हायरल लोड कमी करण्याचे काम करते. ‘डेथ रेट’ त्या औषधाने कमी होत नाही. ‘मिथिलीन ब्लू’ या औषधाने निश्चितपणे ‘डेथ रेट’ कमी होऊ शकतो.
- भारतात हे औषध अजून गोळय़ांच्या रुपात उपलब्ध नाही. मात्र लवकरच ते उपलब्ध होईल, अशी अशा आहे.
- कोविड रुग्णांना ‘नेब्युलायझर’च्या माध्यमातून हे औषध द्यावे लागते.
- हे औषध आपण घरी देखील बनवू शकतो. 10 एम. एल. ची इंजेक्शन व्हायल मेडिकल दुकानातून विकत घेऊन 100 सी. सी. च्या उकळून थंड केलेल्या पाण्यात ते मिक्स केले, तर हे औषध आपण घरच्या घरी तयार करु शकतो. हे औषध फ्रिजमध्ये ठेवावे लागत नाही. तसेच ते तब्बल तीन वर्षे टिकते. जंतू संसर्ग या औषधाला होत नाही.
- कोविड लस घेण्यापूर्वी एक दिवस अगोदर व लस घेतल्यानंतर सात दिवसांपर्यंत हे औषध घेता येणार नाही.
- हे औषध घेतले तरी माक्स, सोशल डिस्टन्सिंग आणि हॅण्ड सॅनिटायझेशन अनिवार्य आहे. कारण या औषधाचा इफेक्ट तीन दिवस असतो.
- ‘मिथिलीन ब्लू’ हे औषध ऍण्टी फंगस म्हणून प्रसिद्ध आहे. ते कोविड व्हायरसला रोखून त्याचा समूळ नाश करते.
- सर्वात महत्वाचे म्हणजे हे औषध रुग्णाची ऑक्सिजनची गरज कमी करते.
व्हायरस म्युटेशन व ब्लॅक फंगसवर रामबाण
या औषधाबाबत अधिक माहिती देताना डॉ. रेडकर म्हणाले, हे औषध व्हायरसच्या म्युटेशनला अजिबात दाद देत नाही. कोरोना व्हायरसने आपले स्वरुप कितीही बदलले, तरी औषधापुढे त्याची मात्रा चालत नाही. कोणत्याही आर. एन. ए. व्हायरसच्या विरोधात लढायला हे औषध सक्षम आहे. एवढेच नव्हे तर ‘म्युकरमायकोसिस’ म्हणजेच अलिकडेच उद्भवलेल्या ‘ब्लॅक फंगस’ या आजारावर हे औषध रामबाण ठरले आहे. रुग्णांना ऑक्सिजन देताना आपण जे नळाचे पाणी वापरतो त्यातून देखील हे इन्फेक्शन होऊ शकते. जर अशा पाण्यात ‘मिथिलीन ब्लू’चे थेंब टाकले, तर हा आजार होण्याचा धोका अजिबात संभवत नाही, असे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला जिल्हय़ातील प्रसिद्ध चेस्ट फिजिशियन डॉ. कोलते, कणकवली येथील संजीवनी कोविड रुग्णालयाचे प्रमुख डॉ. विद्याधर तायशेटे, जिल्हा कोविड रुग्णालयातील फिजिशियन डॉ. गौरव घुर्ये, डॉ. पवार, वेंगुर्ले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आश्विनी माईंडकर आदी उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयाबरोबरच सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये वापर व्हावा!
‘मिथिलीन ब्लू’ च्या वापराबाबत पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण विशद करताना डॉ. रेडकर म्हणाले, आज आपला सिंधुदुर्ग अतिशय भयानक परिस्थितीतून जात आहे. आपल्या जिल्हय़ाचा कोविड मृत्यूदर राज्यात प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. कोरोना बाधितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत रामबाण गुण दाखवणारे हे औषध सिंधुदुर्गातील शासकीय रुग्णालयांमध्ये वापरण्याची परवानगी शासनाने द्यावीत. हे औषध प्रुव्हड असलच्dयामुळे खासगी कोविड सेंटर्समध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने ते वापरता येते. परंतु, 90 टक्के रुग्ण हे शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्यामुळे शासकीय रुग्णालयात ते वापरले गेले तर 90 टक्के रुग्णांना याचा फायदा मिळू शकतो. रेमडेसिविर हे आता बंदी घातलेले व मोठय़ा प्रमाणावर साईड इफेक्ट देणारे इंजेक्शन वापरायची परवानगी शासन देऊ शकते. तर, साईड इफेक्ट न देणारे व डेथ रेट कमी करणारे आणि अत्यंत कमी दरात उपलब्ध होऊ शकणारे ‘मिथिलीन ब्लू’ हे औषध वापरायला परवानगी देण्यात शासनाने मुळीच वेळ काढू नये. किमान सिंधुदुर्गपुरता तरी या औषधाचा वापर करण्याची परवानगी शासनाने त्वरित द्यावी अशी आग्रही विनंती डॉ. रेडकर यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.









