दक्षिण चीन समुद्राप्रकरणी अमेरिकेचे विधान- चीनशी मुकाबल्याची तयारी
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अमेरिका आणि चीन यांचे संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले होते. तर जो बायडेन अध्यक्ष झाल्यावरही स्थिती बदलताना दिसून येत नाही. अमेरिका आणि चीनचे नौदल दक्षिण चीन समुद्रात पुन्हा समोरासमोर उभे ठाकले आहे. 6 महिन्यांत दुसऱयांदा दोन्ही देशांच्या युद्धनौका या भागात परस्परांसमोर आहेत.
चीनच्या या कृत्यानंतर अमेरिकेने सतर्कतेची भूमिका दर्शविली आहे. या भागातील मित्रदेशांचे रक्षण करणे आमचे कर्तव्य आहे. तैवानबाबतीत चीनच्या कारवायांवर आमची नजर असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
युएसएस रुझवेल्टद्वारे संदेश
बायडेन यांनी सत्तासुत्रे हाती घेतल्यावर चीनने अमेरिकेची प्रतिक्रिया जाणून घेण्याच्या उद्देशाने दक्षिण चीन समुद्र आणि तैवानवरून लढाऊ विमानांचे उड्डाण घडवून आणले होते. चीनची युद्धनौका पूर्वीच तेथे तैनात आहे. अमेरिकेने वेळ न दवडता त्वरित स्वतःच्या सर्वात आधुनिक युद्धनौकांपैकी एक युएसएस रुझवेल्टला दक्षिण चीन समुद्रात तैनात केले आहे. या युद्धनौकेवर अमेरिकेच्या नौदलाची 14 लढाऊ विमाने आणि 21 हेलिकॉप्टर्स आहेत. याचबरोबर ते आण्विकयुद्धाचेही एक महत्त्वाचे अस्त्र आहे. चीनजवळ याला प्रत्युत्तर देण्याची क्षमता नाही.
संघर्षाचा उद्देश नाही
दक्षिण चीन समुद्रातील स्थितीवर अमेरिकेचा संरक्षण विभाग अधिक माहिती देण्यास तयार नाही. संघर्षाची शक्यता आम्ही फेटाळतो, आमचे थियोडोर रुझवेल्ट कॅरियन स्ट्राइक ग्रुप तेथे आहे. चिनी सैन्याच्या प्रत्येक कृत्यावर बारकाईने नजर ठेवली जात आहे. अमेरिकेच्या सैन्यासाठी चीन कुठले आव्हान उभे करेल असे वाटत नसल्याचे पेंटागॉनने म्हटले आहे.
अनेक देशांची शत्रुत्व
चीन बळजबरीने दक्षिण चीन समुद्रक्षेत्रावर नियंत्रण प्रस्थापित करू पाहत आहे. तेथील प्रत्येक देशासोबत त्याचा वाद तसेच तणाव आहे. ब्रुनेई, मलेशिया, फिलिपाइन्स, तैवान आणि व्हिएतनामवर चीन स्वतःचे नौदल आणि वायुदलाद्वारे दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या भागातील कुठल्याही देशावरील हल्ला हा अमेरिकेवरील हल्ला मानण्यात येणार असल्याचे अमेरिकेने यापूर्वीच स्पष्ट पेले आहे.









