वृत्तसंस्था/ नारायणपूर, छत्तीसगड
मिझोरामने स्वामी विवेकानंद पुरुषांच्या यू-20 राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. गट ड मधील सामन्यात त्यांनी त्रिपुराचा 11-1 असा एकतर्फी धुव्वा उडविला. अन्य एका सामन्यात झारखंडने हिमाचल प्रदेशचा पराभव केला.
मिझोरामने गट ड मध्ये तीन सामन्यांतून 9 गुण घेत आघाडीचे स्थान मिळविले आहे. याच गटात महाराष्ट्र व त्रिपुरा यांनी प्रत्येकी 6 गुण मिळविले आहेत. येथील सामन्यात मिझोरामने उत्तरार्धात 9 गोलांची बरसात केली. पूर्वार्धात त्यांनी 2-1 अशी आघाडी घेतली होती. याच गटातील अन्य एका सामन्यात झारखंडने हिमाचल प्रदेशचा 2-1 असा पराभव केला. मध्यंतराला ते 1-0 असे आघाडीवर होते. चंद्रा मोहन सॉय व दक्ष कुमार यांनी झारखंडचे तर आर्यन ठाकुरने हिमाचलचा एकमेव गोल नोंदवला..









