वार्ताहर / बाळेकुंद्री
कर्नाटक-महाराष्ट्र व गोव्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा रेणुकादेवीची माही पोर्णिमेनिमित्त होणारी यात्रा यंदा प्रथमच कोरोनामुळे मंदिराचे अधिकारी, मठाचे स्वामी तसेच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शनिवारी साधेपणाने साजरी करण्यात आली. दरम्यान पुन्हा कोरोनामुळे देवीचे दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. तरीही भाविक डोंगर पायथ्याशी येऊन देवीची आराधना करत धार्मिक कार्यक्रम आटोपून घेत आहेत. शुक्रवार व शनिवारी डोंगराच्या पायथ्याशी भाविक ठाण मांडून होते.
सध्या पुन्हा कोरोनाचा वाढल्याने सध्या भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मंदिर प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून देवीचे दर्शन बंद ठेवण्यात आल्याचे मंदिराचे अधिकारी रवि कोटारगस्ती यांनी सांगितले.
गुरुवारी सायंकाळी हिरेमठ स्वामी तसेच मंदिराचे कार्यनिर्वाहक अधिकारी रवि कोटरगस्ती व मंदिराच्या पुजाऱयांच्या हस्ते पारंपरिक पध्दतीने धार्मिक वातावरणात देवीला अभिषेक, होम विशेष पूजा व आरती आदी धार्मिक विधी पार पडले.









