ऑनलाईन टीम/ मुंबई
भारताचा माजी क्रिकेटपटू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली आहे. सचिननेच याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली. आपण होम क्वारंटाइन असून डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सुचनांचे मी पालन करत असल्याचेही या ट्विटरमध्ये सचिनने म्हटलं आहे.
कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मी सर्व खबरदारी घेत होतो. या व्हायरसची काही लक्षणे जाणवल्यानंतर मी चाचणी केली असता याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. घरातील अन्य सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे सचिनने पोस्टमध्ये म्हटले आहे. मी स्वत:ला घरी होम क्वारंटाइन करून घेतले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी योग्य अशी काळजी घेत असल्याचेही त्याने ट्वविटमध्ये म्हटले आहेे.
काही दिवसांपूर्वी सचिन रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये खेळला होता. या स्पर्धेत सचिनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकाचा पराभव करत विजेतेपद मिळवले होते.
देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. महाराष्ट्रात तर कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण राज्यात उद्या, रविवार रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश शुक्रवारी जारी करण्याचे निर्देश त्यांनी मदत आणि पुनर्वसन विभागाला दिले.