आयपीएल स्पर्धेत आज दुसरी लढत
मुंबई / वृत्तसंस्था
मास्टर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्स व अप्रेन्टिस रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघ आज (शनिवार दि. 10) आयपीएल स्पर्धेतील दुसऱया साखळी सामन्यात आमनेसामने भिडणार आहेत. विजयी सलामी देण्याचा दोन्ही संघांचा अर्थातच प्रयत्न असेल. सायंकाळी 7.30 वाजता ही लढत खेळवली जाणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ मागील हंगामात उपविजेता ठरला होता. यंदा जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्याच्या इराद्याने मैदानात उतरण्याचा त्यांचा निर्धार असेल. साहजिकच, येथे विजयी सलामी देणे, हे त्यांचे मुख्य लक्ष्य असणार आहे.
तीनवेळचे चॅम्पियन्स चेन्नई सुपरकिंग्ससाठी मागील हंगाम अतिशय कटू स्मृती देणारा ठरला. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात ते प्रथमच साखळी फेरीतच गारद झाले. शिवाय, 8 संघात 7 व्या स्थानी फेकले गेले. यंदा तो इतिहास मागे सारत येथे नव्याने सुरुवात करण्याचा धोनीसेनेचा प्रयत्न असणार आहे.
स्मिथ, धवनमुळे फलंदाजी भक्कम
दिल्लीची फलंदाजी शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ व स्वतः रिषभ पंत यांच्यामुळे भरभक्कम आहे. धवनने मागील हंगामात 618 धावांची आतषबाजी करत सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत दुसऱया स्थानी झेप घेतली होती. अगदी इंग्लंडविरुद्ध संपन्न झालेल्या वनडे मालिकेत देखील तो उत्तम बहरात दिसून आला. या आयपीएल मोसमात तो महत्त्वाकांक्षी असेल.
पृथ्वी शॉ बहरात
पृथ्वी शॉने अलीकडेच संपन्न झालेल्या विजय हजारे चषक स्पर्धेत सर्वाधिक 827 धावांची आतषबाजी केली असून तो व धवन सलामीला उतरण्याचे संकेत आहेत. दिल्ली संघात अष्टपैलू मार्कस स्टोईनिस, शिमरॉन हेतमेयर, सॅम बिलिंग्जसारखे अव्वल खेळाडू आहेत. मात्र, अंतिम एकादशमध्ये केवळ चारच विदेशी खेळाडू खेळवण्याची मुभा असल्याने संघाचा समतोल राखताना कसोटी लागू शकते. गोलंदाजीत या संघाकडे इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, उमेश यादव, ख्रिस वोक्स व ऍनरिच नोर्त्झे असे उत्तम पर्याय आहेत. पहिल्या सामन्यात रबाडा व नोर्त्झे एकवेळ खेळू शकले नाहीत तरी ही या संघासाठी फारशी चिंतेची बाब असणार नाही.
वानखेडे स्टेडियमच्या संथ खेळपट्टीवर रविचंद्रन अश्विन व अमित मिश्रा हे गोलंदाजी भरीव कामगिरी करु शकणार का, याची आज उत्सुकता असेल. अक्षर पटेल मागील शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले असून यामुळे तो या लढतीत उपलब्ध असणार नाही.
रैनामुळे चेन्नई आणखी भक्कम
डावखुरा सुरेश रैना संघात परतला असल्याने चेन्नई सुपरकिंग्स संघासाठी ही जमेची बाजू ठरु शकते. रैना आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा जमवणारा फलंदाज असून सध्या त्याच्या खात्यावर 5368 धावा नोंद आहेत. रैनासह ऋतुराज गायकवाड, दक्षिण आफ्रिकन फॅफ डय़ू प्लेसिस व अम्बाती रायुडू यामुळे चेन्नईची फलंदाजी भक्कम असेल.
सॅम करण, मोईन अली, धोनी यांच्यासारखे मॅचविनर्सही या संघात आहेत. शार्दुल ठाकुर, दीपक चहर, रविंद्र जडेजा समयोचित योगदान देऊ शकतील. वानखेडे स्टेडियमवरील ही लढत प्रेक्षकांविना खेळवली जाणार असून यात मास्टर धोनी जिंकणार की अप्रेन्टिस रिषभ पंत वरचष्मा गाजवण्यात यशस्वी होणार, याचा उलगडा आजच्या या लढतीतून होईल.
प्रतिस्पर्धी संघ
दिल्ली कॅपिटल्स ः रिषभ पंत (कर्णधार व यष्टीरक्षक), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, शिमरॉन हेतमेयर, मार्कस स्टोईनिस, ख्रिस वोक्स, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, ललित यादव, प्रवीण दुबे, कॅगिसो रबाडा, ऍनरिच नोर्त्झे, इशांत शर्मा, अवेश खान, स्टीव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपाल पटेल, विष्णू विनोद, लुकमन मेरिवाला, एम. सिद्धार्थ, टॉम करण, सॅम बिलिंग्ज.
चेन्नई सुपरकिंग्स- महेंद्रसिंग धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सुरेश रैना, अम्बाती रायुडू, केएम असिफ, दीपक चहर, डेव्हॉन ब्रेव्हो, फॅफ डय़ू प्लेसिस, इम्रान ताहीर, एन. जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सॅन्टनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, सॅम करण, आर. साई किशोर, मोईन अली, के. गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, सी. हरी निशांत.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 पासून.









