केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना : तिसऱया लाटेदरम्यानच्या उपचारपद्धतीबाबतही निर्देश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी मास्कच्या वापरासंबंधी आणि मुलांच्या उपचारपद्धतीबाबत नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार 5 वर्षांखालील मुलांना मास्क वापरण्याची सक्ती नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, 6 ते 11 वयोगटातील मुले पालकांच्या देखरेखीखाली मास्कचा योग्यरित्या वापर करू शकतात, असे या नियमावलीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच 12 वर्षांवरील सर्वांनी मास्क वापरावे, अशी सूचना करण्यात आली आहे.
18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या उपचारात अँटिव्हायरल किंवा मोनोक्लोनल अँटिबॉडीज वापरण्याची शिफारस केलेली नाही. जर स्टिरॉईड्सचा वापर मुलांच्या उपचारांमध्ये केला जात असेल तर, क्लिनिकल सुधारणेवर अवलंबून डोस 10 ते 14 दिवसांत कमी केला पाहिजे, असेही सुचविण्यात आले आहे. तसेच 5 वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी मास्कची सक्ती केलेली नाही. मात्र, 12 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींनी मास्क घालणे गरजेचे आहे. अलीकडेच, तज्ञांच्या एका गटाने या मार्गदर्शक तत्त्वांचे पुनरावलोकन केले. त्यानंतर कोरोना विषाणू आणि त्याच्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ते जारी केले आहे. इतर देशांतील उपलब्ध डेटावरून ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे होणारा रोग कमी गंभीर असल्याचे लक्षात येत आहे. तथापि, संसर्गाच्या लाटेमुळे याबाबत काळजीपूर्वक निरीक्षण करणे आवश्यक असल्याचा निर्वाळा देण्यात आल्यामुळे जनतेला सतर्क करण्यात आले आहे.
आतापर्यंत 160 कोटींहून अधिक डोस
देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत लसींचे 160 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. गुरुवारी दिवसभरात 70 लाख 49 हजार 779 डोस देण्यात आले. या आकडेवारीमुळे एकंदर डोसचा आकडा 160 कोटी 43 लाख 70 हजार 484 वर पोहोचला आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत 9 हजार 692 लोकांना कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये झाली आहे.
चोवीस तासात 3.47 लाख नवे बाधित
गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 3 लाख 47 हजार 254 नवीन बाधित आढळले असून 703 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील दैनंदिन रुग्णवाढीचा दर 17.94 टक्के झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 20 लाख 18 हजार 825 झाली आहे. त्याचबरोबर कोरोना महामारीमुळे जीव गमावणाऱयांची संख्या 4 लाख 88 हजार 396 झाली आहे. गुरुवारी दिवसभरात 2 लाख 51 हजार 777 लोक कोरोनोतून बरे झाले आहेत. तसेच देशात आतापर्यंत 3 कोटी 60 लाख 58 हजार 806 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.









