प्रतिनिधी / पणजी
सार्वजनिक ठिकाणावर मास्कचा वापर न करणाऱयांवर पोलीस कडक करवाई करीत असून आत्तापर्यंत तब्बल 1 लाख 62 हजार 276 जणांना दंड ठोठावण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावावर आळा घालण्यासाठी मास्क वापरणे व सामाजिक अंतर राखणे काळाची गरज आहे.
मास्कचा वापर करणे बंधनकारक असल्याचा नियम सरकारने लागू केला होता. तेव्हापासून मास्क न वापरणाऱया विरोधात पोलिसांनी कडक कारवाई करणे सुरु केले आहे. दक्षिण गोवा पोलीस उत्तर गोवा पोलीस तसेच वाहतूक पोलीस विभाग मास्क न वापरणाऱया विरोधात कारवाई करीत आहे. आतापर्यंत केलेल्या कारवाईत 2 कोटी 33 लाख 28 हजार रुपये निधी पोलीस खात्याने केवळ मास्क न वापरणाऱया विरोधात कारवाई करून गोळा केला आहे.
उत्तर गोवा पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईत 72 हजार 737 जणांना दंड ठोठावला असून 1 कोटी 18 लाख 86 हजार 100 इतका निधी जमा केला आहे. दक्षिण गोवा पोलिसांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत 72 हजार 163 जणांवर मास्क न वापरल्या प्रकरणी कारवाई केली आहे. त्यात 1 कोटी 10 लाख 96 हजार 700 रुपये निधी जमा केला आहे. वाहतूक पोलीस विभागाने मास्क न वापरणाऱया विरोधात केलेल्या कारवाईत 17 हजार 376 जणांना दंड ठोठावला आहे. त्यात 34 लाख 75 हजार 200 रुपये इतका रक्कम जमा केली आहे.









