आटपाडी / प्रतिनिधी
कोरोना उपाययोजनांसाठी सर्वत्र प्रशासन दक्ष असतानाही अनेक लोक मास्कचा वापर करत नसल्याची वस्तुस्थिती आहे. अशा मास्क न वापरणाऱ्या लोकांना ग्रामपंचायतर्फे मास्क बांधुन आनोख्या पध्दतीने ‘गांधीगिरी’चा उपक्रम झरे येथे राबविण्यात आला. कोरोना उपाययोजना समितीच्या माध्यमातुन मास्क न वापरणाऱ्यांना मास्क बांधुन प्रबोधन करत लाजविण्यात आले.
आटपाडी तालुक्यातील झरे येथे सरपंच सिंधु माने, अधिकराव माने, ग्रामसेवक दत्तात्रय गळवे, धनंजय वाघमारे, हणमंत मोटे, विलास वाघमारे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, कोरोना आपत्ती व्यवस्थापन समितीने सोमवारी चौकात जमणारे व मास्कशिवाय बिनधास्त फिरणाऱ्यांवर निशाणा साधला. स्वतः सदस्यांनी अशा लोकांना मास्क बांधले. अधिकराव माने, धनंजय वाघमारे, ग्रामसेवक दत्तात्रय गळवे व सहकाऱ्यांनी अनोख्या पध्दतीने गांधीगिरीचा हत्यार म्हणून वापर केला.
पश्चिम भागातील झरे गावाची लोकसंख्या सुमारे ३२०० इतकी आहे. गावात चांगली बाजारपेठ आहे. शिवाय सातारा जिल्ह्याच्या सिमेवर असल्याने येथे परिसरातील लोकांची नेहमीच मोठी वर्दळ असते. यापूर्वी मास्क वापरत नसल्याच्या कारणावरून ग्रामपंचायतने १० हजार रूपये दंड वसुल केला आहे. तरीही अनेक लोक मास्ककडे कानाडोळा करत आहेत. हे चित्र घातक असून ग्रामपंचायत व कोरोना उपाययोजनाच्या कमिटीने चक्क गांधीगिरी करून लोकांना जागे करण्याचे काम केले.
Previous Article‘त्या’ 36 कर्मचाऱ्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचा केला सत्कार
Next Article महाराष्ट्र बंद यशस्वी करण्याचा निर्धार








