प्रतिनिधी/ गुहागर/ चिपळूण :
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱयांनी सर्व नागारिकांसाठी मास्क न वापरणे बंधनकारक केले असून न वापरणाऱयांकडून 500 रूपये दंड वसुली करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार गुरूवारी जिल्हय़ात 18 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱया गुहागर तालुक्यात शृंगारतळीत 7 तर चिपळूणमध्ये 11 जणांविरोधात कारवाई करताना त्यांच्याकडून 9 हजार रूपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधित रूग्ण तालुक्यातील शृंगारतळी येथे सापडला होता. परिणामी शृंगारतळी आयसोलेट करण्यात आले होते. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्यावतीने येथील जनतेच्या संरक्षणासाठी निर्जंतुकीकरण, मास्क, सॅनिटायझर वितरण यांसारखी उपाययोजना करत जनतेमध्ये जनजागृतीही करण्यात आली. शृंगारतळीतील कोरोनाबाधित रूग्ण पूर्णपणे बरा होऊन आपल्या गावी दाखल झाला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्यांचे सर्वांचे रिपोर्टही निगेटीव्ह आले आहेत. यामुळे 30 दिवसांच्या कालावधीनंतर ग्रामपंचायतीने संरक्षणाची ही मोहीम व्यापकपणे राबवण्यासाठी मास्क न वापरणाऱया व्यक्तीला 200 रूपयांचा दंड आकारण्याचे ग्रामपंचायतीच्यावतीने यापुर्वी जाहीर करण्यात आले होते, असे सरपंच संजय पवार यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले. ग्रामपंचायतीने राबवलेल्या या मोहिमेमध्ये एकूण 9 जणांवर कारवाई करत प्रत्येकी 200 रूपयाप्रमाणे 1800 रूपये दंडाची वसुली करण्यात आली.
त्यानंतर जिल्हाधिकाऱयांनीच मास्क न वापरणाऱयांवर 500 रूपये दंडाची कारवाई करण्याचा आदेश जारी केला. या आदेशाप्रमाणे पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्यावतीने गुरूवारी शृंगारतळी पोलीस चौकी व बाजारपेठेत पावतीबुक घेऊन कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली होती. गुरूवारी दिवसभरात 7जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून 3500 रूपयांची दंड वसुली ग्रामपंचायतीने केली आहे. यामुळे यापुढे आपले गाव, तालुका, राज्य व देश सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने काढलेल्या आदेशाचे अधिक काटेकोरपणे पालन करून कारवाई केली जाईल, असे सरपंच पवार यांनी सांगितले.
चिपळुणात 11 जणांवर कारवाई
जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाप्रमाणे चिपळूण नगर परिषदेनेही शहरात मास्क न घालता फिरणाऱया 11 नागरिक व व्यापाऱयांवर प्रत्येकी 500 रूपयांप्रमाणे दंडाची कारवाई करण्यात आली. अशाप्रकारे एकूण 5 हजार 500 रूपये दंड वसुली झाली.
आणखी 12 अहवाल निगेटीव्ह
गुरूवारी सांयकाळी 5 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार प्रशासनाला 12 अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व निगेटीव्ह आहेत. आणखी 18 नमुन्यांचे अहवाल प्रलंबीत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. गुरूवारी सायंकाळपर्यंत एकूण 610 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यातील 584 अहवाल निगेटीव्ह आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.