मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना आदेश : पोलिसांना गोवा शिपयार्डकडून रुग्णवाहिका : महिलांसाठी 7875756177 व्हॉट्स ऍप हेल्पलाईन
प्रतिनिधी / पणजी
मास्कचा वापर हव्या त्या प्रमाणात होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मास्क न वापरणाऱयांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई करताना दंडाची रक्कम 100 रुपयांऐवजी आता 200 रुपये वसूल करा, असा तोंडी आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिसांना दिला आहे. राज्यातील काही व्यवसायांना शिथिलता देऊन ते सुरु करण्यात आले असले तरी मास्क वापरू नका किंवा सामाजिक अंतर राखू नका, असे सरकारने म्हटलेले नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
काल सोमवारी गोवा शिपयार्डने पोलीस खात्याला रुग्णवाहिका भेट दिली. तसेच महिलांवरील होणारे अत्याचार 0 टक्के करण्यासाठी पोलीस खात्याने 7875756177 हा हेल्पलाईन वॉट्सअप नंबर जारी केला आहे. त्यानिमित्त आयोजित केलेल्या छोटेखानी उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, पोलीस महासंचालक मुकेशकुमार मिणा, गोवा शिपयार्डचे चेअरमन तसेच व्यवस्थापकीय संचालक बी.बी. नागपाल उपस्थित होते. कार्यक्रमात महिला आयोगाच्या अध्यक्ष विद्या गावडे तसेच महिला व बालविकास खात्याच्या संचालक दिपाली नाईक उपस्थित होत्या.
पोलिसांच्या आरोग्यासाठी अनेक साधने
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की आत्तापर्यंत कोविड19च्या काळात पोलिसांनी चांगले कार्य बजावलेले आहे. अनेक पोलिसांनाही कोरोनाला सामोरे जावे लागले. पोलीस कार्य बजावतांना त्यांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पोलिसांचे आरोग्य सुव्यवस्थित राखण्यासाठी पोलीस खात्याला सरकारकडून अनेक साधने पुरविली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गोवा शिपयार्डने सुसज्ज असलेली रुग्णवाहिका प्रदान केली आहे. गोवा शिपयार्डचा पोलीस खात्याला मोठा आधार मिळत असतो. या अगोदरही गोवा शिपयार्डच्या वतीने विविध सुविधा पुरविण्यात आल्या आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
महिलांवरील अत्त्याचार रोखण्यासाठी हेल्पलाईन
राज्यात महिलांवर होणारे अत्याचार 0 टक्क्यावर आणण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. पोलीस त्या मार्गाने कार्य करीत आहेत. कुणाही महिलेवर अत्याचार होत असल्यास त्यांनी 7875756177 या क्रमांकावर वॉट्सअप एसएमएस पाठवावा, पोलीस त्याची दखल घेतील. हा हेल्पलाईन नंबंर गोव्याच्या कानाकोपऱयात प्रसिध्द करावा इतकेच नव्हे तर गोव्यात येणाऱया महिला पर्यंटकांनाही हा नंतर सहज उपलब्ध होईल याचीही दखल घ्यावी. बस स्थानक, रेल्वे स्थानक, विमानतळ समुद्र किनारी भागात तसेच अन्य ठिकाणी या नंबरची जाहिरात करावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पोलीस खात्याचे कार्य खूपच चांगले
भाजपा सरकारच्या कार्यकाळात गोवा पोलीस खात्याचे कार्य खूपच चांगले आहे. गुन्हेगारी प्रकरणेही कमी झाली असून तपासकामाची टक्केवारी वाढलेली आहे. ड्रग्सच्या बाबत पोलीस चागंले काम करीत असून गेल्या 14 महिन्यात सर्वात जास्त ड्रग्स जप्त करण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पोलीस खात्यात लवकरच 1200 पदे भरणार
गेल्या काही महिन्यांत मोठय़ा प्रमाणात पोलिसांना बढत्या देण्यात आल्या आहेत. पोलीस खात्यात 1200 जागा रिक्त असून त्याही लवकरात लवकर भरल्या जातील. पोलीस मुख्यलयाच्या इमारतीचा मोठा प्रश्न आहे. तोही लवकर सोडविला जाणार आहे. येणाऱया अर्थसंकल्पात पोलीस मुख्यालयाच्या इमारतीचा प्रश्न सोडविला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पोलिसांचे कार्य कौतुकास्पद : श्रीपाद नाईक
केविड 19 काळात पोलिसांचे कार्य कौतुकास्पद आहे असे केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. पोलीस खाते सर्वक्षेत्रात सुसज्ज करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. त्याच बरोबर गोवा शिपयार्डही सहकार्य करीत आहे. येत्या काही दिवसात बीइएलतर्फेही कर्क रोग ओळखणारे यंत्र गोवा मेडिकल महाविद्यालयाला (गोमेकॉ) प्रदान करण्यात येणार असल्याचे श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
यावेळी गोवा शिपयार्डने मुख्यमंत्र्यांना रुग्णवाहिकेची चावी प्रदान केली. तसेच मुख्यमंत्र्यानी हेल्पलाईन नंबरचे अनावरण पेले. पोलीस महासंचालक मुकेशकुमार मिणा यांनी मान्यवरांचे स्वागत केले. गोवा शिपयार्डचे बी.बी नागपाल यांनी मनोगत व्यक्त करताना गोवा शिपयार्ड सरकारला कशा पध्दतीने सहकार्य करीत आहे, याची सविस्तर माहिती दिली.









