प्रतिनिधी/ पणजी
अनलॉक सुरू होताच देशभरातून पर्यटक गोव्यात येऊ लागले आहेत. बऱयाच ठिकाणी पर्यटक मास्क आणि सामाजिक अंतराचे निकष पाळताना दिसत नाहीत. पणजी चर्चसमोर मास्क न घालता फिरणाऱया 15 पर्यटकांवर पणजी मनपाने दंडात्मक कारवाई केली आहे. यापुढे देखील असे प्रकार आढळले तर त्यांच्यावर कारवाई सुरूच राहील, असा इशारा महापौर उदय मडकईकर यांनी दिला आहे.
पर्यटकांचे गोव्यात स्वागत असले तरी मास्क न घालता फिरणे सामान्य माणसांसाठी किती धोकादायक आहे ते समजणे आवश्यक आहे. पर्यटकांचा ओघ वाढत असून सदर मोहीम शहरात सुरूच ठेवण्यात येणार आहे. याशिवाय पर्यटक जर असेच बेजबाबदार वागत राहिले तर सरकारने पर्यटकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणे आवश्यक आहेत, असे मतही मडकईकर यांनी व्यक्त केले.









