आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचा इशारा
प्रतिनिधी/ पणजी
कोरोनाची भीती कायम असतानाही तब्बल 60 टक्के लोक मास्क वापरत नसल्याचे दिसून आले असून, हा निष्काळजीपणा भविष्यात घातक ठरू शकतो व त्यातून पुन्हा कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिला आहे.
खास करून राज्यात येणारे पर्यटक आणि त्यांचा निवास तसेच करमणुकीची व्यवस्था करणाऱया हॉटेल व्यावसायिकांनी हा प्रकार गांभीर्याने घ्यावा, आपल्या ग्राहकांना मास्क वापरण्यासंबंधी माहिती द्यावी, प्रसंगी सक्ती करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही श्री. राणे यांनी दिला आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आरोग्य सचिव अमित सतिजा, आरोग्य संचालक डॉ. ज्योस डिसा, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ. उदय काकोडकर यांच्यासह अन्य डॉक्टर त्यावेळी उपस्थित होते. मास्क न वापरण्याच्या या प्रकाराची सुरुवातचमुळी विमानतळावरून होते, तेथील 60 टक्क्यांपेक्षा अधिक प्रवाशी मास्कच वापरत नसल्याचे दिसून आले आहे. हा प्रकार आपण स्वत: अनुभवला आहे. त्याचबरोबर पर्यटकांची प्रथम पसंती असलेल्या समुद्रकिनाऱयांवरही तसाच प्रकार दिसून आला आहे. अशाप्रकारचे दुर्लक्ष सर्वांसाठीच घातक ठरू शकते, त्यातून निष्पाप लोक या रोगाचे बळी ठरू शकतात, अशी भीती श्री. राणे यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील बडय़ा तारांकित हॉटेलात संगीत रजनी वा अन्य करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, त्यावेळी कोरोनासंबंधी कोणत्याही मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्यात येत नसल्याची माहिती मिळाली आहे. अन्य लॉजिंग बोर्डिंगमध्येही तेच प्रकार निदर्शनास आले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी ग्राहकांना मास्क वापरण्याची सक्ती करावी, असे आवाहन श्री. राणे यांनी केले आहे. अन्यथा अशा हॉटेलवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मास्क न वापरणाऱया पर्यटकांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. परंतु कुणीही त्याची भीती बाळगत नाहीत. त्यावर उपाय म्हणून दंडाची रक्कम वाढविणे हा पर्याय ठरू शकतो. त्यासंबंधी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणी करणार असल्याचे राणे यांनी सांगितले. विदेशात हा प्रकार अत्यंत गांभीर्याने घेतला जातो व दंडही मोठय़ा प्रमाणात आकारला जातो, अशी माहिती त्यांनी दिली.
कोरोनाला जात-पात, गरीब-श्रीमंत हा भेदभाव लागत नाही. परिणामी आमच्यासारख्या राजकीय तथा सामाजिक क्षेत्रातील लोकांनाही आज या रोगाने ग्रासले आहे. सदैव जनसंपर्कात राहात असल्यामुळे स्वतः कितीही काळजी घेतली तरी कोणतरी अनाहूत आमच्या संपर्कात येतो आणि आम्हालाही बाधित करून सोडतो. त्यातून सध्या आपले आई-बाबा यांनाही या रोगाची लागण झाली असल्याचे श्री. राणे यांनी सांगितले.
काही लोक तोंडावर मास्क बांधतात व नाक उघडेच ठेवतात. ही पद्धत चुकीची असून मास्कद्वारे तोंड व नाक दोन्ही योग्य प्रकारे झाकले पाहिजे. तेवढी दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.
दरम्यान, पर्यटकांना अशाप्रकारे विनामास्क वावरण्यास मुक्तांगण देण्यास सरकारच जबाबदार आहे, अशा पर्यटकांवर पोलीस कारवाई करत नसल्यामुळे त्यांना कुणाचीही भीती राहिलेली नाही. त्याचा ते पुरेपूर फायदा घेतात, असे आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले असता, आम्ही कठोर कारवाई केल्यास त्यातून गोव्याबद्दलचे वाईट चित्र निर्माण होईल व त्याचे विपरित परिणाम पर्यटन व्यवसायावर होईल. त्यापेक्षा प्रत्येकाने स्वतः जबाबदारीने वागून मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब केल्यास कोरोना आपोआप नियंत्रणात येईल, असे श्री. राणे म्हणाले.
कोरोना चाचण्यांची क्षमता वाढविण्यावर युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दोन अत्याधुनिक चाचणी यंत्रे स्थापन करून विद्यमान चाचणी क्षमतेत 1000 ची वाढ करणे, त्याचबरोबर मडगाव येथील इएसआय इस्पितळात 150 जादा खाटांची व्यवस्था करणे, यासारखे निर्णय घेण्यात आले आहे. त्याचबरोबर दक्षिण जिल्हा इस्पितळातील आयसीयू विभाग शनिवारपासून कार्यरत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
युकेत कोरोनाचा नवा प्रकार सापडल्यानंतर 9 ते 20 डिसेंबर दरम्यान गोव्यात पोहोचलेल्या सुमारे 30 नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यातील 26 जण बाधित सापडले. 12 चाचण्याचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत. मात्र यातील एकही प्रवाशी नव्या प्रकाराचा वाहक नव्हता, असे सिद्ध झाल्याचे राणे यांनी सांगितले.









