कोरोना महामारीला रोखण्यासाठी बहुतांश देशांनी मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन अनिवार्य केले आहे. परंतु याचदरम्यान दक्षिण अमेरिकेतील एका देशाच्या अध्यक्षाला सार्वजनिक स्थळी मास्कशिवाय सेल्फी घेणे महागात पडले आहे. देशाच्या अध्यक्षालाच सुमारे 2.5 लाख रुपयांचा दंड भरावा लागला आहे.
महिलेसोबत सेल्फी
चिलीचे अध्यक्ष सेबेस्टियन पियनेरा यांनी एका महिलेसोबत मास्कशिवाय सेल्फी काढून घेतली होती. हे छायाचित्र प्रसारित होताच अध्यक्षांवर निर्बंधांचा भंग केल्याप्रकरणी 3500 डॉलर्सचा (257624 रुपये) दंड ठोठावण्यात आला. तर अध्यक्ष पियनेरा यांनी या छायाचित्राप्रकरणी जाहीर माफीही मागितली आहे.
चूक मान्य
कोरोनासंबंधीच्या नियमांचा भंग केल्याचे चिलीच्या अध्यक्षांनी मान्य केले आहे. काचागुआमध्ये घरानजीकच्या समुद्र किनाऱयावर हिंडत असताना एका महिलेने छायाचित्रासाठी विनंती केली, तेव्हा मास्क घालायला हवा होता असे त्यांनी म्हटले आहे. चिलीमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्कच्या वापराचे कठोर नियम आहेत. चिलीमध्ये मास्क न वापरणे हा दंडनीय गुन्हा आहे.
कैदेची तरतूद
चिलीच्या कायद्यात या नियमाचा भंग करणाऱयांवर मोठा दंड ठोठावण्यासह तुरुंगात पाठविण्याचीही तरतूद आहे. चिलीत कोरोना संक्रमण वेगाने वाढत आहे. चिलीत आतापर्यंत 5 लाख 81 हजार 135 रुग्ण सापडले असून 16,051 जणांचा मृत्यू ओढवला आहे.









