ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे आहे. असे असले तरी अनेक मुंबईकर सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरत नाहीत. असे सध्याचे चित्र आहे.
त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्या मुंबईकरांवर मुंबई महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. 20 एप्रिलपासून मुंबईकरांकडून पालिकेने साडेतीन कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
दरम्यान, मुंबईत कोरोनात लक्षणीय वाढ जाणवू लागल्यानंतर पालिकेकडून विविध उपाय योजले जात आहेत. त्यात घराबाहेर पडल्यानंतर मास्कचा वापर अनिवार्य आहे. तसे न केल्यास पालिकेकडून 200 रुपयांचा दंड आकारला जात आहे. सुरुवातीला या कारवाईचा जोर कमी होता. नंतर त्याचा वेग वाढत चालला आहे.
त्यातून 20 एप्रिल ते 29 ऑक्टोबरपर्यंत मास्क न वापरणाऱ्या 1,60,279 जणांविरोधात कारवाई केली आहे. त्यातून पालिकेस 3 कोटी 49 लाख 34 हजार एवढा दंड मिळाला आहे.