कुटबण जेटीवर मासेमारीसाठीची लगबग वाढली, सरकारने घातलेल्या अटींचे सर्वांनी पालन करावे : विनय तारी, केंद्र व राज्य सरकारांचे अभिनंदन
सुनील फातर्पेकर / कुंकळ्ळी
मासेमारीला व माशांच्या विक्रीला अखेर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशास अनुसरून राज्य सरकारने सशर्त मान्यता दिल्याने इतके दिवस माशांपासून वंचित राहिलेल्या गोमंतकीय खवय्यांबरोबर ट्रॉलरमालक व मासळीविक्रेते यांनी समाधान व्यक्त केले आहे. कुटबण मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष विनय तारी यांनी या निर्णयाविषयी बोलताना आनंद व्यक्त केला. मात्र हे पाऊल आधीच उचलले जाण्याची गरज होती, असे मत मच्छीमारांनी व्यक्त केले आहे.
दक्षिण गोव्यातील प्रमुख जेटी असलेल्या कुटबणमध्ये यामुळे मासेमारीवर जाण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. शनिवारी ट्रॉलर्स मासेमारीकरिता सज्ज करण्याच्या दृष्टीने सारी तयारी करण्यात आली. रविवारी काही ट्रॉलर्स समुद्रात रवाना झाले असल्याची माहिती कुटबणमधील मच्छीमारांनी दिली. दरम्यान, मासेमारीला व माशांच्या विक्रीला मान्यता दिल्याबद्दल केंद्र व राज्य सरकारांचे तारी यांनी अभिनंदन केले आहे. यामुळे ट्रॉलरमालक व मासळीविक्रेते यांना उत्पन्न मिळेल. मात्र ट्रॉलरमालक व मासेविक्रेते यांनी सरकारने ज्या अटी घातलेल्या आहेत त्यांचे पालन करावे, असे त्यांनी आवाहन केले.
कोरोना विषाणूची साथ व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मासेमारी व माशांच्या विक्रीवर लादलेली बंदी उठवावी अशी मागणी खवय्यांकडून तसेच ट्रॉलरमालक, मासळीविक्रेते यांच्याकडून जोर धरू लागली होती. त्यातच मासळीविक्रेत्यांना हवे असल्यास त्यांनी साठविलेले मासे घेऊन त्यांची विक्री करावी असे सांगण्यात आल्याने मच्छीमार व विक्रेते या दोन्ही घटकांमध्ये नाराजी पसरली होती. यामागे कोणाचे हित जपण्याचा प्रयत्न आहे, असा प्रश्न त्यांच्याकडून उठविला जाऊ लागला होता. सदर मासे बऱयाच काळापासून साठवून ठेवलेले असू शकतात. त्यामुळे त्यांचा दर्जा चांगला न राहण्याची शक्यता त्यांच्याकडून व्यक्त होऊ लागली होती. तसेच खवय्यांनी त्यांच्यावर फॉर्मेलिनचा वापर केलेला असण्याची भीतीही व्यक्त केली होती.
दंडामुळे वाढली होती नाराजी
त्यातच समुद्रात गेलेल्या ट्रॉलर्सना पकडलेली मासळी खाली करण्यासाठी 9 पासून तीन दिवस परवानगी देताना 3 सिलिंडर्सच्या ट्रॉलर्समागे 5 हजार, 4 सिलिंडर्सच्या ट्रॉलरमागे 5 हजार व 6 सिलिंडर्सच्या ट्रॉलरमागे 25 हजार असा दंड निश्चित करण्यात आला होता. यामुळे ट्रॉलरमालकांमध्ये नाराजी पसरली होती. आपण 40 हजारांची मासळी पकडून आणलेली होती. मात्र 25 हजार रुपयांचा दंड चुकता केल्यानंतर आपल्या हाती केवळ 15 हजार राहिले, अशी कैफियत शुक्रवारी एका ट्रॉलरमालकाने व्यक्त केली होती. इतरही काही ट्रॉलरमालकांना असाच अनुभव आला होता. या पार्श्वभूमीवर आलेला नवा आदेश सर्वांना दिलासादायक ठरला आहे.
कामगारांचा प्रश्न निकालात
कोरोनाची साथ व मासेमारीवर आलेले निर्बंध यामुळे अनेक ट्रॉलर्स जेटीवर नांगरून ठेवण्यात आले होते. ट्रॉलरवरील कामगारांना आता सांभाळायचे कसे असा प्रश्न ट्रॉलरमालकांसमोर उपस्थित होऊन काही जणांनी आपल्या कामगारांना गावी रवानाही केले होते. ताज्या आदेशामुळे कामगारांच्या खर्चाचा भार कसा पेलायचा हा प्रश्न सुटला आहे. तसेच मोसम संपल्यानंतर घरी जाताना कामगारांना ट्रॉलरमालक आगावू पैसे देत असतात. ट्रॉलर बंद राहिल्यास हे आगावू पैसे कसे द्यायचे असा प्रश्न त्यांना सतावत होता. तोही आता निकालात निघालेला आहे, असे तारी यांनी सांगितले. मोसम संपण्यास साधारपणपणे दोन महिने राहिलेले असून या कालावधीत भरपूर मासळी गवसेल व चांगली कमाई होऊन कामगारांना आगावू पैसे देण्याची तरतदू करणे शक्य होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, जेटीच्या परिसरात नांगरून ठेवलेल्या ट्रॉलरमुळे पारंपरिक मच्छीमारांच्या जाळय़ांची हानी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. ट्रॉलर्स मासेमारीवर गेल्याने सदर नौकांनाही आता दिलासा मिळणार आहे.
‘कोविड-19’ निधीस मदत करा

दरम्यान, ‘कोविड-19’संबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जे निधी स्थापन केलेले आहेत त्यास ट्रॉलरमालकांनी मदत करावी, असे आवाहन विनय तारी यांनी केले आहे. त्याचबरोबर ‘तरुण भारत’ने मच्छीमारांना भेडसावत असलेल्या समस्यांवर जो सविस्तर प्रकाशझोत टाकला त्याचाही उल्लेख करून त्यांनी ाढाwतुकोद्गार काढले. सरकारचा हा निर्णय येण्यास त्याचाही हातभार लागलेला आहे, असे मत तारी यांनी व्यक्त केले.









