वादळी वाऱयात आश्रयाला आलेल्या नौकांची खोल समुद्रात खुलेआम मासेमारी
प्रशांत चव्हाण/ गुहागर
वादळी वाऱयापासून बचाव व्हावा म्हणून रत्नागिरीच्या जयगड खाडीत गेले 15 दिवस आश्रयाला असलेल्या परप्रांतिय नौकांपैकी काही नौका रत्नागिरी जिह्यातील काही सागरी भागात मासेमारी करताना स्थानिक मच्छिमारांना दिसून येत आहेत. दोन दिवसांपूर्वी गुहागर व आता त्यांचे ठिकाण दापोलीतील बुरोंडी, दाभोळ क्षेत्र दाखवत असून खुलेआम मासेमारी करणाऱया या नौकांना जिह्याचा समुद्र आंदण दिला आहे की काय, असा सवाल स्थानिक मच्छिमारांनी उपस्थित केला आहे.
अगोदरच जिह्याच्या मत्स्य उत्पादनाला या ना त्या कारणांनी फटका बसत असताना व दरवर्षी मत्स्य उत्पादन घटत असताना अशा स्थितीत परप्रांतीय नौकांकडून अशापध्दतीने होणारी बेकायदेशीर मासेमारी स्थानिक मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळणारी असल्याच्या प्रतिक्रिया मच्छिमारांमधून व्यक्त होत आहेत. संकटकाळात आश्रयाला आलेल्या एखाद्या बाहेरील व्यक्तीला घराच्या पडवीत आपण आश्रय दिला तर तो नक्कीच घरी घुसण्याचा प्रयत्न करतो. असाच काहीसा प्रकार रत्नागिरी जिह्याच्या सागरी भागात सध्या दिसून येत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 13 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत मुसळधार पाऊस व वादळी वाऱयाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. या भीतीने सुरक्षिततेचा उपाय म्हणून 15 दिवसांच्या कालावधीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळ, गोवा, गुजरात या राज्यांतील मच्छिमार नौकांनी जयगड खाडीचा आसरा घेतला होता. जयगड, तवसाळ, पडवे, काताळे या बंदरातून अंदाजे 700 ते 800 बोटी आश्रयाला होत्या. या नौका पर्ससीन मासेमारी करणाऱया दिसून येत होत्या. पर्ससीन मासेमारीवर काहीप्रमाणात बंदी असून ज्यांच्याकडे पर्ससीन मासेमारीचे परवाने आहेत अशाच नौकांना पर्ससीन मासेमारी करता येते. मात्र आश्रयासाठी आलेल्या सर्वच नौकांवरती पर्ससीन मासेमारीची जाळी दिसून आल्याने या नौका बेकायदेशीर पर्ससीन मासेमारी करत नाहीत ना, अशीही शंका निर्माण झाली होती. ‘तरुण भारत’मध्ये अशा आशयाचे वृत्तही प्रसिध्द झाले होते. मात्र निद्रिस्त असलेल्या जिह्यातील मत्स्य विभागाला अद्यापही जाग आलेली नसल्याचे यावरुन स्पष्ट दिसून येत आहे.
आश्रयाला आलेल्या या मासेमारी नौकांपैकी वादळी वाऱयाचा धोका टळल्यानंतर किती नौका आपल्या मायदेशी गेल्या, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. कारण दोनच दिवसांपूर्वी गुहागरच्या खोल समुद्रात कर्नाटक राज्यातील मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर्स 12 वावामध्ये बेकायदेशीरपणे मासेमारी करत असल्याचे मच्छिमारांना दिसून आले होते. सध्या हे ट्रॉलर्स दापोली किनारपट्टीत मासेमारी करीत असल्याचे त्यांच्या लोकेशनवरुन दिसून येत आहे. याबाबत मत्स्य विभागाच्या एका अधिकाऱयाने माहिती दिली. अशा नौकांवर कारवाई करायची असल्यास स्पीड बोटी लागतात. मात्र अशा गस्ती नौका रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यासाठी अद्याप मंजूर नसल्याने बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱया नौकांवर कारवाई करणे जिकिरीचे बनत चालले असल्याचे मत्स्य अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.
बेकायदेशीर मासेमारीचा जिह्याच्या मत्स्य उत्पादनाला फटका
गेल्या पाच वर्षात रत्नागिरी जिह्याच्या मत्स्य उत्पादनाचा आलेख खालावत चाललेला आहे. 2017-18मध्ये 80 हजार 340, तर 2018-19मध्ये 73 हजार 738 मेट्रीक टन एवढेच मत्स्य उत्पादन झाले होते. म्हणजे 6 हजार 602 मे. टन मत्स्य उत्पादन गेल्यावर्षी घटले होते. गेल्यावर्षीचे हे मत्स्य उत्पादन यावर्षी अधिकच मोडीत निघाले असून यावर्षी 7 हजार 565 मेट्रीक टन इतकी घसरण होऊन केवळ 66 हजार 173 मेट्रीक टन मत्स्य उत्पादन झाले आहे. मत्स्य उत्पादनाचा हा घटता आलेख मत्स्य व्यवसायाला मारक ठरलेला आहे. या घटत्या मत्स्य उत्पादनाला अनेक कारणे असली तरी अशा परप्रांतीय नौकांकडून होणाऱया बेकायदाशीर मासेमारीचाही तितकाच परिणाम यावर होत असल्याने जिल्हा मत्स्य विभागाने यावर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जिह्यातील मच्छिमारांनी केली आहे.









