वार्ताहर / कुंभारजुवे
एकीकडे कोरोना महामारी,तर दुसरीकडे महागाई, अशा दुहेरी दुष्टचक्रात लोक अडकले असताना केंद्र सरकारने इंधनदरवाढ करून लोकांचे कंबरडेच मोडले आहे. ही दरवाढ मागे घेऊन जनतेला दिलासा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसच्या प्रियोळ गटातर्फे माशेल येथील पेट्रोल पंपावर इंधनदरवाढी विरोधात धरणे आंदोलन करत सरकारचा निषेध केला.
यावेळी काँग्रेसचे प्रियोळ गटाध्यक्ष हेमंत नाईक, प्रियोळ मतदारसंघाचे माजी अध्यक्ष गुरुदास कोरगांवकर, गोवा प्रदेश काँगेस कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण जल्मी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसने देशावर अनेक वर्षे राज्य केले परंतु एवढय़ा प्रमाणात इंधनदरवाढ कधीच केलेली नाही. याउलट भाजपने केवळ विविध योजनांची घोषणाबाजी करत लोकांना दारिद्रय़ाच्या खाईत लोटले. भाजपच्या काळात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. इंधनदरवाढ करून लोकांना आपल्याकडील वाहने केवळ शोभेच्या वस्तू म्हणून ठेवण्यास भाजप सरकारने भाग पाडले आहे. याच काँग्रेसतर्फे तीव्र निषेध करत असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.
काँग्रेसचे गटाध्यक्ष हेमंत नाईक, गुरुदास कोरगांवकर, रामकृष्ण जल्मी आदींनी यावेळी भाजप सरकारच्या विरोधात तीव्र शब्दांत निषेध नोंदवून इंधनदरवाढ मागे घेण्याची मागणी केली. धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे यावेळी हेमंत नाईक यांनी अभिनंदन केले.









