प्रतिनिधी / सांगली
हाक्के वस्ती हाळ भाग कारंदवाडी येतील प्रभाकर पाटील यांच्या शेताजवळील नदीपात्रात मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळीत मगरीचे पिल्लू गंभीरित्या अडकलेले आढळले. त्याला राहत अॅनिमलच्या टीमने जीवदान दिले.
सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पाटील व अभिजित पाटील यांनी मगरीच्या पिल्लाला काईलीच्या सहाय्याने जवळ जाऊन जाळी कापुन तिला अडकलेल्या जाळीसहित नदी बाहेर घेतले. पण पिल्लू गंभीरपणे अडकल्याने त्यातून पिल्लाला सोडवणे त्यांना अवघड झाले त्यांनी सदर घटना ॲनिमल राहत संस्थेस कळवली. ॲनिमल राहतचे प्राणी कल्याण निरीक्षक कौस्तुभ पोळ, योगेश इनामदार, प्रसाद सुर्यवंशी घटना स्थळी पोहोचले. त्यांनी मगरीच्या पिल्लाची कमीतकमी वेळात तिची मानवीय पद्धतीने हाताळणी करून तिला जाळीतून मुक्त केले आणि कोणतीही इजा झाली नसल्याची खात्री केली.
ॲनिमल राहतच्या कौस्तुभ पोळ यांनी तेथील नागरिकांना मगरीचे महत्व पटवून सांगितले तसेच त्यांच्या मधील मगरीबाबतचे गैरसमज दूर केले. वनविभागाचे वनरक्षक अमोल साठे यांच्या उपस्थितीत तिला नैसर्गिक अधिवासात सोडले.








