‘न्यूट्रिटेरा’ उत्पादनाला ‘प्रेंड ऑफ द सी’चे मानांकन : समन्वयक अमोद साळगावकर यांची माहिती
मालवण:
समुद्रातील मासे हे ‘ओमेगा-3’च्या मुख्य स्रोतांपैकी एक आहेत. आता माशांप्रमाणेच ‘ओमेगा-3’ची गरज ही वनस्पतीजन्य स्त्राsतातून मिळवता येईल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ‘न्युसीड’ कंपनीच्या ‘न्युट्रीटेरा’ या उत्पादनाला ‘प्रेंड ऑफ द सी’चे वनस्पतीजन्य आधारित आंतरराष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. न्यूट्रिटेराला ‘पेंड ऑफ द सी’चे मानांकन हा आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण असल्याचे वनस्पतीजन्य आधारित मानांकनाचे जागतिक प्रकल्प समन्वयक अमोद अशोक साळगावकर यांनी सांगितले.
अमोद साळगावकर यांचे मूळ गाव कुडाळ तालुक्यातील साळगाव असून ते रत्नागिरीत वास्तव्याला असतात. सध्या कामानिमित्त ते मुंबईला असतात. सागरी वातावरणाचे संरक्षण करून निर्माण केलेली उत्पादने व त्यांच्या सेवा यांना आंतरराष्ट्रीय मानांकन प्रमाणित करणारी “Friend of the Sea” ही जागतिक स्तरावरील संस्था आहे. न्यूसीड (Nuseed) ही कॅलिफोर्नियास्थित कंपनी कॅनोला, ज्वारी, सूर्यफूल आदींची शेती व विविध उत्पादने बनविण्यासाठी प्रसिद्ध असून त्यांचा व्यवसाय बऱयाच देशात विस्तारलेला आहे. न्यूसीड कंपनीचे “Nutriterra” हे उत्पादन वनस्पतीजन्य पदार्थांतून मिळणाऱया ओमेगा-3 च्या स्रोतावर आधारित आहे. ‘प्रेंड ऑफ द सी’चे वनस्पतीजन्य आधारित मानांकनप्राप्त करणारे ‘न्यूट्रिटेरा’ हे जगातील पहिले उत्पादन ठरले आहे. शाश्वत उत्पादन पद्धतीच्या काटेकोर वचनबद्धतेमुळे हे साध्य झाले आहे. त्यामुळे यापुढे न्यूट्रिटेरा या उत्पादनाच्या सर्व वेष्टनावर ‘प्रेंड ऑफ द सी’चे वनस्पतीजन्य आधारित बोधचिन्ह वापरले जाईल, जे शाश्वत उत्पादन पद्धत व पर्यावरण संरक्षणाच्या हमीचे निदर्शक असेल, असे साळगावकर यांनी सांगितले.
ओमेगा-3 चे सागरी आधारित स्रोत Docosahexaenoic Acid (DHA) आणि Eicosapentaenoic Acid (EPA) यांनी समृद्ध आहेत, तर कॅनोला मूळत: Alpha-Linolenic Acid (ALA) पुरवतात. कॅनोला या वनस्पतींपासून तयार करण्यात आलेले न्यूट्रिटेरा हे उत्पादन DHA, EPA आणि ALA आदी fatty acids सुयोग्य प्रमाणात प्रदान करते. कॅनोला बियाण्यांचा नवीन जैवतंत्रज्ञान पद्धतीने वापर करून न्यूट्रिटेरा हे उत्पादन विकसित केले गेले आहे. वैज्ञानिक संशोधनात गुंतवणूक करून न्यूसीड कंपनीने विकसित केलेल्या वनस्पतीजन्य ओमेगा-3 च्या स्रोतामुळे जमीनही सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. न्यूसीडने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कॅनोलापासून निर्माण केलेल्या ‘न्यूट्रिटेरा’मुळे जगाला DHA fatty acid चा पुरवठा मुबलक प्रमाणात होणार असून त्यामुळे DHA च्या पुरवठय़ाकरिता समुद्र स्रोतांवर पडणारा ताण कमी होण्याबरोबरच ग्राहकांना एक नवीन चव मिळेल. कॅनोला हे एक हंगामी पीक असून हे पीक मातीच्या गुणवत्ता वाढीसाठी मोलाचे योगदान देते आणि त्यामुळे पीक उत्पादनात उत्तरोत्तर वाढ होत जाते. पेंड ऑफ द सीविषयी अधिक माहिती हवी असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन साळगावकर यांनी केले आहे.
‘प्रेंड ऑफ द सी’विषयी थोडसं…
‘प्रेंड ऑफ द सी’ ही संस्था World Sustainability Organization (WSO) प्रकल्पांतर्गत मत्स्यव्यवसाय, मत्स्यसंवर्धन, मत्स्य खाद्य व ओमेगा-3 च्या शाश्वत पद्धतींना प्रमाणित करणारी जागतिक पातळीवरील संस्था आहे. या संस्थेमार्फत रेस्टॉरंट्स, शाश्वत सागरी जहाज वाहतूक, व्हेल व शार्क मासे समुद्र सफर, मत्स्यालय, शोभिवंत मासे अशा विविध विषयांवर पथदर्शी प्रकल्प जागतिक स्तरावर राबविले जातात. National Accreditation Body ची मान्यता असणारा शाश्वत मत्स्य मानांकनामध्ये काम करणारा “Friend of the Sea” हा जगातील एकमेव कार्यक्रम आहे.









