प्रतिनिधी /काणकोण
वाहत्या पाण्यात कचरा तसेच प्लास्टिकच्या बाटल्या टाकण्याचे त्याचप्रमाणे कचराकुंडय़ा असताना देखील रस्त्याच्या बाजूला कचऱयाच्या पिशव्या टाकून जाण्याचे प्रकार हल्ली काणकोणच्या मुख्य रस्त्याबरोबरच अंतर्गत भागांतील रस्त्यांवर वाढलेले आहेत. काणकोण पालिका क्षेत्रात आणि बहुतेक सर्वच पंचायतींमध्ये कचरा गोळा करणे आणि तो नेण्याचे काम व्यवस्थित चालू असताना रिकाम्या ओढय़ात, नदीत तसेच समुद्रकिनाऱयाची मजा लुटण्यासाठी येणाऱया पर्यटकांकडून रिकाम्या बाटल्या समुद्रात फेकण्याचे प्रकार घडत आहेत.
भरती-ओहोटीच्या वेळी या रिकाम्या बाटल्या किनाऱयावर येऊन पडत असल्याचा अनुभव या ठिकाणी आलेल्या परदेशी पर्यटकांनी बऱयाच वेळा घेतलेला असून स्वतः या परदेशी पर्यटकांनी किनारा साफ करण्याची मोहीम यापूर्वी हातात घेतलेली आहे. गालजीबाग येथील मासेमारीसाठी गेलेल्या काही युवकांना मात्र वेगळाच अनुभव दोन दिवसांपूर्वी मिळाला. हौस म्हणून मासेमारीसाठी गेलेल्या या युवकांना माशांऐवजी चक्क प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचऱयाने भरलेले जाळे घेऊन यावे लागले. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धनाची घोषण देताना त्यासाठी सरकार दरवर्षी विविध कार्यक्रम करत असते. मात्र असे प्रकार करणाऱयांना कोण आळा घालणार असा प्रश्न या युवकांनी या प्रतिनिधीशी बोलताना केला.









