आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी
कोकरूड / वार्ताहर
माळेवाडी ता. शिराळा येथे अज्ञात चोरट्यांनी राहते घर फोडून ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. पोलिसांनी चार दिवसांतच या चोरीचा छडा लावून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तर, त्याच्याकडून 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बाबाजी जगन्नाथ गोसावी असे या आरोपीचे नाव आहे. गोसावी याला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, माळेवाडी येथील घरमालक मचिंद्र रघुनाथ पवार (वय ३४) हे शुक्रवारी दि.30 जुलै रोजी आपल्या कुटुंबासह बाहेर गावी नातेवाईकांकडे गेले होते. ते सोमवार २ ऑगस्ट रोजी सकाळी घरी परत आले असता घराचा मुख्य दरवाजा उघडा असलेचे दिसले. घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा काशानेतरी तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील बेडरूममध्ये प्रवेश करून तिजोरी फोडून ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याबाबत मचिंद्र पवार यांनी कोकरूड पोलिसात फिर्याद दिली होती.
स.पो.नि ज्ञानदेव वाघ यांनी तपासास गती देत तेथीलच संशयीत आरोपी बाबाजी गोसावी याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून 20 हजार रुपये हस्तगत केले असून आरोपीस तीन दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली आहे.
स.पो.नि ज्ञानदेव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक एम.एम मुल्ला, पो.कॉ. विशाल भोसले, पो.ना. अजहर गवंडी, पो.हे.कॉ. शिवाजी शेळके, पो.म. कॉ. सुर्यवंशी यांनी ही कारवाई केली.








