सत्यजीत देशमुख; शिराळ्यातीलगावांना भूस्खलनाचा धोका; शेतीचे प्रचंड नुकसान
प्रतिनिधी / सांगली
अतिवृष्टीमुळे शिराळा तालुक्यातील भात, ऊस, भाजीपाला शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गावे पाण्याखाली होती. त्यांचा संपर्क तुटला होता. सहापेक्षा जास्त गावांना भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. जिल्हाप्रशासनाचे शिराळा तालुक्याकडे दुर्लक्ष आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,मंत्र्यांनीही तालुक्याकडे पाठ फिरवली आहे. शिराळा तालुक्यात माळीण, तळई सारखी घटना घडल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत का असा सवाल भाजप नेते सत्यजीत देशमुख यांनी पत्रकार बैठकीत बोलताना उपस्थित केला.
दरम्यान शिराळा तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी, नागरिकांना एनडीआरएफच्या नियमापेक्षा चौपट मदत मिळायला हवी, अशी मागणीही देशमुख यांनी यावेळी बोलताना केली. तालुक्यात पंचनामे पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत,असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. दरम्यान शासनाने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे. पूरग्रस्त, अतिवृष्टीने ग्रस्त नागरिक, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी आहे, अशी टीकाही देशमुख यांनी केली आहे.








