मुंबई \ ऑनलाईन टीम
मालाडच्या मालवणीत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी मालवणीत जाऊन दुर्घटनेतील जखमींची चौकशी केली. यावेळी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करत जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मालाड येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील जखमी रहिवाशांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय येथे जाऊन विचारपूस केली. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, महापालिकेचे सह आयुक्त चंद्रशेखर चोरे, उपायुक्त विश्वास शंकरवार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मालाड दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच या घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्तांशी चर्चा केली तसेच मदत व बचाव कार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश दिले. अग्निशमन दल, महानगरपालिकेची पथके, पोलीस हे रात्रीपासून बचाव कार्य करीत होते.
मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा लहान मुलांचा समावेश आहे. ही सर्व मुले 10 वर्षाच्या आतील आहेत. या जखमींवर सध्या कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.








