रॉक गार्डनमधील म्युझिकल फाऊंटनचा लोकार्पण सोहळाही
प्रतिनिधी / मालवण:
मालवण शहरातील सुमारे साडेसहा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि रॉक गार्डनमधील म्युझिकल फाऊंटनचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर व वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.
या कामांमध्ये मालवण नगरपरिषद कार्यालय येथे अग्निशमन केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकामाचे भूमिपूजन होणार आहे. यासाठी शासनाच्या अग्निशमन सेवा आणिबाणीच्या सेवांचे बळकटीकरण करणे यातून सुमारे 2 कोटी 1 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. तसेच सोमवार पेठ येथे भाजीमार्केट इमारत बांधकामाचे भूमिपूजन होणार आहे. हे काम महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर यातून घेण्यात आले आहे. यासाठी 1 कोटी 81 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. साई मंदिरनजीक धुरीवाडा येथे मालवण नगरपरिषदेचे जलतरण प्रशिक्षण व क्रीडा संकुलस्थळी प्रमाणित बॅडमिंटन हॉलचे भूमिपूजन होणार आहे. हे काम वैशिष्टय़पूर्ण योजनेतून होणार आहे. यासाठी 1 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
लोकापर्ण सोहळा
मालवणात येणाऱया पर्यटकांचे मुख्य आकर्षण असणाऱया रॉक गार्डन येथे बसविण्यात आलेल्या म्युझिकल फाऊंटनचा लोकार्पण सोहळाही होणार आहे. हे काम पर्यटनस्थळ विकास मूलभूत सुविधा पुरविणे यातून करण्यात आले आहे. यासाठी सुमारे 1 कोटी 26 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात दाखल होणाऱया पर्यटकांना पर्वणी मिळणार असल्याचेही कांदळगावकर यांनी सांगितले.









