‘विलास ऍग्रो एजन्सी’ची सुमारे 12 लाखांची हानी
लगतच्या अन्य दुकानांनाही झळ : बचावकार्य करताना रणजीत पारकर जखमी
पालिकेच्या अग्निशमन बंबाची पुन्हा चर्चा : खबरदारीचा भोंगाही वाजला नाही, व्यापारी बांधवांमुळे आग आटोक्यात
प्रतिनिधी / मालवण:
मालवण बाजारपेठेतील विलास हरमलकर यांच्या विलास ऍग्रो एजन्सी या दुकानाला रविवारी पहाटे 3.45 च्या सुमारास भीषण आग लागली. दुकानाच्या पाठिमागील भागाकडून ही आग संपूर्ण दुकानातील साहित्यापर्यंत पोहोचून भडकली. आगीच्या ज्वाळा बाजारपेठेतील अन्य दुकानांमध्ये काम करणाऱया युवकांना दिसल्यानंतर मदतकार्य सुरू करण्यात आले. व्यापारी बांधवांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर दीड ते दोन तासानंतर आग आटोक्यात आली. मात्र, आगीत विलास ऍग्रोचे सुमारे 12 लाख रुपयांचे नुकसान झाले. दुकानाला लागून असलेल्या रमेश पारकर यांच्या घराच्या छपराचे आगीच्या ज्वाळांमुळे मोठे नुकसान झाले.
परिसरातील व्यापारी बांधवांनी घटनास्थळी धाव घेत जीव धोक्मयात घालून मदतकार्य केले. त्यानंतर दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, नगर पालिकेच्या अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. पालिकेकडून आगीच्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या फायर बॉलमधील अनेक बॉल फुटले नसल्याचे मदतकार्यातील अनेकांनी सांगितले. याच्या उलट विनायक सापळे यांनी उपलब्ध करून दिलेले दोन्ही फायरबॉल योग्यप्रकारे फुटले. पालिकेचा बंब नसल्याने उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विनायक सापळे यांनी आपल्या घरातून पाण्याचा पाईप फिरवून आगीवर नियंत्रण आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. पोलीस यंत्रणा तसेच तलाठय़ांनीही घटनास्थळाची पाहणी करत नुकसानीची पंचयादी घातली.
मुंबरकर कुटुंबियांमुळे आगीची माहिती
बाजारपेठेतील गुरुमाऊली या दुकानात रात्री उशिरापर्यंत मुंबरकर कुटुंबिय माल लावण्याचे काम करत होते. त्यांना मारुती मंदिरसमोरील विलास ऍग्रो या दुकानातून आगीचे लोट येत असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत स्थानिक व्यापाऱयांना माहिती देत, मदतीसाठी धाव घेतली. त्याचवेळी किनाऱयावरून हेमंत आचरेकर यांनाही आगीच्या ज्वाळा दिसल्या. दोन्हींकडून मदतीसाठी दुकानाच्या परिसरात धाव घेण्यात आली. त्यावेळी फारुक ताजर आणि रमेश पारकर यांनी माती आणि पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतर सर्वांशी संपर्क साधत मदतकार्य उभे करण्यात आले.
स्थानिक व्यापाऱयांची धाव
बाजारपेठेतील दुकानाला आग लागल्याची माहिती अनेकांनी मोबाईलद्वारे सर्वांना दिली. मालवण पालिकेलाही माहिती देण्यात आली. मात्र, पालिकेने खबरदारीचा भोंगा वाजविला नाही. त्यामुळे इतर व्यापारी अगर नागरिकांना आगीची माहिती समजली नाही. त्यामुळे मदतीसाठी काही ठराविक युवक आणि व्यापाऱयांनी धाव घेतली. जर भोंगा वाजवून शहरात आग लागल्याची कल्पना देण्यात आली असती, तर मदतकार्यासाठी मोठय़ा संख्येने नागरिक जमा झाले असते, असे यावेळी व्यापारी वर्गाने सांगितले.
आगीचा प्रचंड भडका उडाला
स्थानिक व्यापारी फारुक ताजर, स्वप्नील अंधारी, विनायक सापळे, रणजीत पारकर, शेखर अंधारी, सरदार ताजर, अमेय देसाई, गणेश सापळे, हेमंत आचरेकर, साई मयेकर, रंजन मुंबरकर, दिनेश मुंबरकर, समीर कदम, भूषण मुंबरकर, आकाश खोत, मंगेश परब, आदित्य देसाई आदी व्यापाऱयांनी पाणी, मातीचा वापर करून आग विझविण्यास सुरुवात केली. वीज कर्मचाऱयांना बोलवून त्या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. नगरपालिकेचे मुकादम विलास वळंजू, रमेश कोकरेही घटनास्थळी पोहोचले. आग विझविण्यासाठी पालिकेकडे असलेल्या फायर बॉलपैकी आठ फायरबॉल आगीत टाकण्यात आले. यातील काही बॉल फुटले, तर काही बॉल तसेच राहिल्याचे व्यापाऱयांनी सांगितले. मात्र, आगीचा प्रचंड भडका उडाल्याने आग नियंत्रणात येत नव्हती.
जीवाची पर्वा न करता व्यापाऱयांचे मदतकार्य
स्वप्नील अंधारी, फारुक ताजर, रणजीत पारकर हे काळोखात अन्य दुकांनाच्या छपरावर चढून आग विझवित असताना रणजीत पारकर हे छपरावरून कोसळले. त्यांना दुखापत झाली. अमेय देसाई यांनी गाडी धुण्यासाठी वापरण्यात येणारे फोर्स पाईप आणून अन्य व्यापारी बांधवांसह लगतच्या दुकानाच्या छपरावर चढून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. स्थानिक व्यापारी जीवाची पर्वा न करता, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे अथक प्रयत्न करत होते. विलास ऍग्रोचे मालक विलास हरमलकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, बांधकाम सभापती मंदार केणी, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, नितीन तायशेटय़े, दिलीप वायंगणकर यासह अन्य व्यापारी वर्ग मदतकार्यात सहभागी होता.
व्यापारी वर्गामुळेच मोठा अनर्थ टळला
बाजारपेठेतील व्यापारी अलर्ट असल्यामुळे भडकत व आजूबाजूला पसरत जाणारी आग नियंत्रणात आणली गेल्याने मोठा अनर्थ टळला. विलास ऍग्रो एजन्सीच्या बाजूला असलेल्या रमेश पारकर यांच्याही दुकानाचे नुकसान झाले. मात्र, व्यापारी बांधवांनी काळोखात मोठय़ा हिमतीने व मेहनतीने आगीवर नियंत्रण मिळविले. पारकर यांच्या घराच्या पाठिमागील दोन्ही बाजूंकडून आग पसरत असल्याने आणि वीजपुरवठा खंडित केल्याने त्यांची पत्नी सौ. राजनंदा यांनी कळशीने पाणी आणून आगीवर नियंत्रण आणण्यासाठी कुटुंबियांना मदत केली. पारकर यांच्या घरात पाणीच पाणी झाले होते. आग वेळीच आटोक्यात आली म्हणून व्यापारी वर्गाचा जीव भांडय़ात पडला. संपूर्ण बाजारपेठेत दुकाने एकमेकांना लागून असल्याने मोठा धोका संभवण्याची भीती व्यक्त होत होती.
अग्निशमन यंत्रणा नसल्याने तीव्र नाराजी
मालवण पालिकेकडे अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसल्याने उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नवीन अग्निशमन गाडी येईपर्यंत जुनी अग्निशमन गाडी आम्हाला द्या. आम्ही स्वखर्चाने ती दुरुस्त करतो. आमदार, खासदार, पालकमंत्री आणि राज्यात सत्ता असताना अग्नशिमन बंब आणणे पालिकेला शक्य होत नाही. त्यामुळे व्यापाऱयांना असा किती दिवस त्रास सहन करावा लागणार आहे? पालिकेचा बंब असता, तर आग काही क्षणात आटोक्यात येऊन नुकसान टळले असते, असे व्यापारी बांधवांतर्फे उमेश नेरुरकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, रणजीत पारकर यांनी सांगितले. दिवाळी उत्सवात जिल्हय़ातून एखादी अग्निशमन गाडी शहरात आणून ठेवणे गरजेचे आहे. पालिकेने तशी व्यवस्था करावी. आम्ही त्या दिवसाचे भाडे भरू, अशी भूमिका उमेश नेरुरकर यांनी मांडली.
नगराध्यक्ष जखमी होता-होता वाचले
विलास ऍग्रो एजन्सीला आग लागल्याची माहिती मिळताच दुकानाच्या परिसरात राहणारे रणजीत पारकर यांनी थेट छपरावर जाऊन दुकानाचे छप्पर बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यात छपरावरून घसरून रणजीत पडले. त्यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. दुकानाच्या छपराचे कौल अचानक खाली कोसळले. त्यावेळी रस्त्यावर उभे असलेल्या नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यावर कौल पडण्याची शक्यता होती. यावेळी त्यांच्या पाठिमागे उभे असलेले माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी त्यांना पाठी घेतल्याने कांदळगावकर यांना दुखापत झाली नाही.









