विनामास्क व अत्यावश्यक कारणाशिवाय फिरणाऱ्या ८६ जणांवर तर वाहतूक नियमांचे उल्लंघन प्रकरणी ४५ जणांवर दंडात्मक कारवाई
मालवण / प्रतिनिधी-
कोरोना ब्रेक द चैन अंतर्गत राज्यात संचारबंदी लागू आहे. या पार्श्वभूमीवर मालवण पोलिस सातत्याने चोख बंदोबस्त ठेवून कारवाई करत आहेत. सोमवारी दिवसभर धडक कारवाई करण्यात आली. यात १३१ व्यक्तींवर २९ हजार १०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
दरम्यान, चौके मार्गावर एका दुचाकी चालकांवर साथरोग प्रतिबंधक अंतर्गत नियमांचे उल्लंघन प्रकरणी कलम १८८ व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांनी सोमवारी रात्री दिली.
पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, भारत फारणे, पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील आदी अधिकाऱ्यांच्या चार टीमद्वारे मालवण शहर व परिसरात तसेच पेंडूर, कट्टा, चौके, देऊळवाडा येथे नाकाबंदी करून कारवाई करण्यात आली.
यात विनामास्क व अत्यावश्यक कारणाशिवाय फिरणाऱ्या ८६ व्यक्तींवर कारवाई करत १७ हजार २०० दंड वसूल करण्यात आला. तर ४५ वाहन चालकांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन प्रकरणी ११ हजार ९०० रुपये दंडाची कारवाई करण्यात आली.









