पोलीस निरीक्षक, तहसीलदार फिरताहेत दुचाकीने : क्रिकेटचा खेळ, अनावश्यक गर्दी आणली नियंत्रणाखाली : सकाळी सात ते सायंकाळपर्यंत ‘ऑन डय़ुटी’
मनोज चव्हाण / मालवण:
संचारबंदी लागू केल्यानंतर बिनधास्त दुचाकी आणि इतर गाडय़ा घेऊन फिरणाऱया आणि घोळक्यात राहणाऱया युवकांना अनेकदा समज देऊन आणि विनंती करूनही ताळय़ावर न येणाऱया तरुणाईला पोलीस निरीक्षक विनीत चौधरी आणि तहसीलदार अजय पाटणे यांच्या धडक कारवाईने चांगलेच वठणीवर आणले आहे. त्यामुळेच मालवणात कायदा आणि सुव्यवस्था चोख राखली जात आहे. यात तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांच्या चौवीस तास काम करण्याच्या धाडसाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
जिल्हय़ात लॉकडाऊन कालावधीत सुरुवातीचे काही दिवस दुचाकीने फिरायला जिल्हाधिकाऱयांनी संधी दिली होती मात्र मोठय़ा संख्येने दुचाकीवरून फिरायला युवाई आणि नागरिक बाहेर पडत असल्याचे दिसून आल्याने जिल्हाधिकारी यांनी तातडीने दुचाकी बंद केल्या. या आदेशाला काहींनी नेहमीप्रमाणे हरताळ फासला आणि बिनधास्तपणे दुचाकीवरून फेरफटका मारायला सुरुवात केली. युवकांची गर्दी पाहून पोलीस निरीक्षक चौधरी यांनी सर्वांच्या गाडय़ा जप्त करण्याचे आदेश दिले. आपण स्वत: सहकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत उभे राहून धडक कारवाई केली. यात एका दिवसांत पन्नासहून अधिक दुचाकी जप्त करण्यात आल्या. सर्वांना नोटीस बजावण्यात आली. ही कारवाई सकाळी सातपासून रात्री उशिरापर्यंत करण्यात आली होती. या कारवाईचा धसका अनेकांनी घेऊन सध्या तरी शहरातील दुचाकींची गर्दी कमी करण्यात त्यांना यश आले आहे.
दुचाकीवरून फेरफटका
तहसीलदार अजय पाटणे दुचाकीचे सारथ्य करत असून पोलीस निरीक्षक विनीत चौधरी हे पाठीमागे सवारी करत आहेत. दुचाकीवरून दोन्ही अधिकारी थेट शहर आणि ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बाहेर पडत आहेत. दररोजच सायंकाळी साडेपाच वाजता पोलीस स्टेशनहून दुचाकी बाहेर पडली, की निश्चितपणे कारवाईला सुरुवात होते. सोबत पत्रकार मंडळींची टिमही असते. प्रत्यक्षात घटनास्थळी काय झाले आणि कोणती कारवाई करण्यात आली, कोणाला फटके पडले, याची नंतर उलटसुलट चर्चा नको, याचीही खबरदारी घेतली जात आहे. कारवाईच्या भीतीने अनेक तरुण डेअरिंग करण्याचे धाडसही करताना दिसत नाहीत. गेले अनेक दिवस सायंकाळी बिनधास्तपणे मैदानावर उतरणारे खेळाडू कारवाईचे लक्ष्य ठरले आहेत. शहरातील कारवाईमुळे ग्रामीण भागातील तरुणाई शांत झाली आहे. या दोन्ही अधिकाऱयांची अनेकांनी धास्ती घेतली आहे.
पासबाबत तहसीलदार दक्ष
तालुक्यातील 63 गावातील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यात अडथळा येऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सरपंचांच्या शिफारशीनुसार गावातील स्वयंसेवक आणि अत्यावश्यक सुविधा पुरविणारी मंडळी यांना ओळखपत्र दिले आहे. या ओळखपत्रांवर स्वतः तहसीलदार सही करून देत आहेत. याचा गैरवापर झाल्यास कडक कारवाईचा इशाराही देत आहेत. गावातील स्वयंसेवकांची माहिती गावातील मोबाईल वापरणाऱयांना देऊन त्यांचे सहकार्य घेण्याची सूचना केली जात आहे.









