गडहिंग्लजच्या भाजी व्यापाऱयाने मोफत दिली दीड टन भाजी
मनोज चव्हाण / मालवण:
तरुण भारतच्या बातमीमुळे चैतन्य गुडमॉर्निंगच्या अन्नछत्र उपक्रमाची माहिती मालवणात गेली दोन वर्षे भाजी विक्रीच्या व्यवसायासाठी येणाऱया नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील भाजीचे व्यापारी फारुक शेख कुटुंबियांपर्यंत पोहोचली अन् शेख यांनी भाजी विक्री व्यवसायातून निर्माण झालेल्या ऋणानुबंधातून मालवणवासींयांप्रती कृतज्ञता म्हणून मालवणकरांना आवश्यक असणारी भाजी मोफत वाटण्यासाठी पाठवून देण्याची इच्छा आणि तयारी त्यांचे स्नेही मालवण केबल नेटवर्कचे अजय पोयेकर यांच्याकडे व्यक्त केली. त्यानुसार सुमारे दीड टन भाजीपाला दोन गाडय़ांतून मालवणमध्ये आणूनही दिला. शेख यांनी मालवणच्या जनतेच्याप्रती दाखविलेल्या आत्मीयतेबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
बेळगाव बाजारातून खरेदी केलेल्या कांदे, बटाटय़ासह विविध प्रकारच्या सुमारे दीड टन भाजीचे दोन टेम्पो शेख कुटुंबीयांनी चैतन्य गुडमॉर्निंग क्लबकडे सुपुर्द केले. गुडमॉर्निंगच्या सर्व खेळाडूंनी ज्या ज्या गावात भाजी पोहोचविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत आणि भाजीपाला पुरवठा गावांमध्ये होत नाही, अशा ठिकाणी भाजीपाला पोहोच केला.
मोफत भाजी वाटप
गुडमॉर्निंगच्या माध्यमातून या भाजीचे वितरण मालवण शहरासह तोंडवळी, तळाशिल, रेवंडी, सर्जेकोटपर्यंत मोफत करण्यात आले. तरीही काहींनी पैसे दिले. यासाठी श्रीनिवास बेकरीच्या मंदार, सुहास, संगिता ओरसकर कुटुंबीयांसह गुडमॉर्निंगचे महेश काळसेकर, प्रथमेश सरमळकर, सचिन गिरकर, अमित कारेकर, मंदार आजगावकर, महेश कारेकर, मनोज घुरी, लारा मयेकर, संदीप गावकर, समीर वायंगणकर, एकता मित्र मंडळाचे अमेय देसाई, युवा व्यापारी संघाचे शैलेश मालंडकर, नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, सर्जेकोट ग्रा. पं. सदस्या भारती आडकर, कांदळगाव विभाग प्रमुख अमोल वस्त यांनी महत्वाचे योगदान दिले. तर घरपोच भाजी वितरणासाठी आवश्यक पिशव्या सापळे स्विट मार्टचे विनायक सापळे व मत्स्यव्यावसायीक शुभांगी चोपडेकर यांनी मोफत उपलब्ध करून दिल्या.
नितीन वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल चैतन्य यांच्याकडून शहरातील सुमारे दोनशेहून अधिक लोकांना दोन वेळचे अन्न मोफत दिले जात आहे. या उपक्रमासाठी अनेकांचे सहकार्य मिळत आहे. तहसीलदार अजय पाटणे आणि पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनीही याबाबत अनेकदा कौतुक केले आहे.









