‘बीकेसी’त आहारतज्ञ म्हणून पाच महिने कार्यरत
आतापर्यंत जवळपास चार हजार रुग्णांची घेतली काळजी
आठ प्रकारांमध्ये आहार केला वर्गीकृत
प्रत्यक्ष भेटी तसेच सॉफ्टवेअरद्वारे आहारावर ठेवले लक्ष
विरार ते वांद्रे असा दररोज दीड तासाचा प्रवास
महेंद्र पराडकर / मालवण:
राज्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत प्रारंभ झाला. प्रारंभाची पहिली लस बीकेसी कोविड सेंटरमध्ये गेले पाच महिने आहारतज्ञ म्हणून सेवा बजावणाऱया डॉ. मधुरा अवसरे-पाटील यांना देण्यात आली. डॉ. मधुरा या मालवणच्या सुकन्या, तर वेंगुर्ले तालुक्यातील केळुस गावच्या स्नुषा आहेत. लसीकरण मोहीम शुभारंभाच्या निमित्तानं कोविड योद्धा म्हणून डॉ. मधुरा यांचे योगदान आज अख्ख्या जगासमोर आले आहे. कोविड योद्धा म्हणून त्यांच्या धीरोदत्त कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून तिच्यामुळे सिंधुदुर्गवासीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.
देशात कोरोना महामारीचा सर्वात जास्त फटका हा मुंबई शहराला बसला. कोरोनामुळे देशाच्या आर्थिक राजधानी कोलमडून पडली. कोरोना महामारीचा बिमोड करण्यासाठी ठिकठिकाणी कोविड उपचार केंद्रे सुरू झाली. यापैकीच एक म्हणजे वांद्रे येथील बीकेसी कोविड केंद्र. हे जगातील दुसरे, तर भारतातील पहिलं सर्वात मोठं कोविड केंद्र म्हणून ओळखले जाते. अशा खडतर अन् कसोटीच्या काळात कोरोना योद्धा म्हणून डॉ. मधुरा अवसरे-पाटील ही 26 वर्षीय तरुणी आहारतज्ञ म्हणून योगदान देत आहे. डॉ. मधुरा यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण मालवणच्या टोपीवाला हायस्कूलमध्ये पूर्ण केले. 2012 मध्ये कोल्हापूर येथील विवेकानंद कॉलेजमध्ये बारावी उत्तीर्ण झाल्यावर 2015 साली रत्नागिरी आर. पी. गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये बीएसी बायोटेक्नॉलॉजीची पदवी प्राप्त केली. 2016 मध्ये आयआयसीटीएन इन्स्टिटय़ूटमधून डिप्लोमा इन ऑबसेटी अँड वेट लॉस आणि डिप्लोमा इन मॅनेजमेंट बाय मशिन्स हा अभ्यासक्रम पूर्ण केला. 2016 पासून तिने परुसिंग मास्टर्स इन क्लिनिकल डायट अँड न्युट्रीशनचा अभ्यास सुरू केला. गेली पाच वर्षे त्या इशियन हार्टसारख्या मोठय़ा इस्पितळात आहारतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सप्टेंबरमध्ये गणेश चतुर्थीनिमित्त त्या मालवणला आल्या असता त्यांना बीकेसीकडून आहारतज्ञ म्हणून सेवा बजावण्याबाबत विचारणा करण्यात आली. कोविड रुग्णांच्या सेवेसाठी बीकेसीकडून झालेला संपर्क हा स्वत:चे कौशल्य आणि कार्याचा गौरव समजून त्या 15 सप्टेंबर रोजी बीकेसीत रुजू झाल्या. त्यानंतर आज पाच महिन्यानंतर जेव्हा कोविड लसीकरणास प्रारंभ झाला तेव्हा कोविड योद्धा म्हणून त्यांचे काम जगासमोर आले आहे.
सुरूवातीचा काळ खडतर, पण डगमगले नाही!
कोरोना योद्धा डॉ. मधुरा आपल्या कामाविषयी सांगतात, बीकेसीमध्ये कार्यरत झाले तेव्हा सुरुवातीला मला थोडा त्रास झाला. पीपीई कीट परिधान करून सेवा बजावणे ही तितकीशी सोपी गोष्ट नाही, याचा प्रत्यय आला. सुरुवातीला श्वास घ्यायला कठीण जायचे. परंतु हळुहळू मी स्वत:ला परिस्थितीशी बऱयापैकी जुळवून घेतले. कोरोनाची खबरदारी घेताना मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर केला. आजमितीपर्यंत मला साधी सर्दी किंवा ताप आलेला नाही. आमचे पाटील कुटुंबियांचे घर विरारला आहे. तेथून दररोज दीड तासांचा प्रवास करून मी ये-जा करते. बीकेसीत दिवसातून सात तास मला सेवा बजावावी लागते. यामध्ये चार तास रुग्णांसमवेत वॉर्डमध्ये सेवा बजावते. तर तीन तास कार्यालयीन कामकाज पाहते. रुग्णांच्या आहारामध्ये आपण जातीनिशी लक्ष घालते. रुग्णांची संख्या जास्त असल्याने एक सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे अधिक चांगल्या प्रकारे आम्हाला रुग्णांच्या आहाराजी काळजी घेता येते. आतापर्यंत गेल्या पाच महिन्यात आपण साधारणपणे चार हजार रुग्णांचा डायट सांभाळलाय, असे डॉ. मधुरा यांनी सांगितले.
मला माझा खूप अभिमान वाटतोय!
राज्याच्या लसीकरणाचा प्रारंभ मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे आणि त्यामध्ये मीसुद्धा एक लाभार्थी आहे, हे मला माहीत होते. परंतु माझा नंबर पहिला असेल, याची कल्पना मला नव्हती. पहिली लस मला दिली जाणार, याची कल्पना मला साधारणत: अर्धा तास अगोदर देण्यात आली. हे समजल्यावर मी पहिला फोन माझे पती रोहन पाटील यांना केला. त्यांनी आणि माझ्या सासरच्यांनी मला पूर्ण पाठिंबा दर्शविला. तसेच माझी आई संध्या अवसरे आणि वडील गोविंद अवसरे यांनीसुद्धा तू काही काळजी करू नकोस. तू लसीसाठी पुढाकार घे, अशा शब्दात प्रोत्साहन दिले. राज्यातील पहिल्या लसीचा मान मला मिळाला, या गोष्टीचा मला निश्चितच अभिमान वाटतो. माझे आई-वडील, पती, सासू-सासरे यांनी नेहमीच मला कोरोना योद्धा म्हणून पाठबळ दिले. त्यांनी माझा विश्वास वाढवला. त्यांच्यामुळेच मी कोरोना याद्धा म्हणून योगदान देऊ शकले. तसेच लसीकरीता मला प्राधान्य दिल्याबद्दल कोविड केंद्राचे अधिष्ठता डॉ. राजेश डेरे यांचीदेखील आभारी असल्याचे डॉ. मधुरा यांनी सांगितले. मालवण शहरात धुरीवाडा येथे डॉ. मधुरा हिचे आई-वडील राहतात. त्यांची भेट घेतली असता त्यांनीसुद्धा आम्हाला आमच्या मुलीचा खूप अभिमान वाटतो, असे उद्गार काढले. डॉ. मधुरा यांचे सासर वेंगुर्ले तालुक्यातील केळुस माईनवाडा येथे आहे.
लसीमुळे कोणताही त्रास झाला नाही!
लस घेण्यासाठी माझ्या कुटुंबियांनी पूर्णत: पाठबळ दिले. लसीकरणाची ही प्रक्रिया दुखण्याविरहीत होती. लस घेतल्यानंतर मला खूपच सहज वाटलं. कोणाताही त्रास जाणवला नाही. मी पूर्णत: नॉर्मल आहे. लस घेतल्यानंतर मी कोविड केंद्रात कार्यरत राहिले आणि आता सायंकाळी काम आटोपून परत विरारला निघालीसुद्धा आहे. माझ्यामुळे इतरांनाही लस घेण्याबाबतचा विश्वास मिळाला, याचे समाधान असल्याचे डॉ. मधुरा यांनी सांगितले.









