वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उद्योगांच्या नावावर बँकांकडून कर्ज घेत ते बुडवून विदेशात पलायन केलेले हिरे व्यापारी नीरव मोदी आणि किंगफिशर एअरलाइन्सचे मालक विजय मल्ल्या यांच्यावरील कारवाई सरकारने सुरूच ठेवली आहे. मल्ल्या आणि नीरव मोदीची मालमत्ता विकून 13 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची वसुली करण्यात आल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे.
मल्ल्या अन् नीरव मोदीची मालमत्ता विकून 13,109 कोटी रुपये प्राप्त करण्यात आले आहेत. बँकांनी आतापर्यंत या दोन्ही फरार थकबाकीदारांची मालमत्ता विकून ही रक्कम मिळविली असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले आहे.
अंमलबजावणी संचालनालयाकडून जुलै महिन्यात विजय मल्ल्या आणि नीरव मोदीच्या मालमत्ता विकून केलेल्या कर्जवसुलीची माहिती दिली होती. तर अर्थमंत्र्यांनी संसदेत अधिकृत माहिती सोमवारी दिली आहे.
युनायटेड ब्रेव्हरीजचा मालक म्हणून मल्ल्या यांनी 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाची मुद्दल अन् व्याज आतापर्यंत फेडण्यात आले नसल्याचा बँकांनी म्हटले आहे. हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मेहुणा मेहुल चोक्सीने पीएनबीसह अनेक बँकांची 13 हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.









