शस्त्रक्रिया सुरू, प्रकृती स्थिर
माले / वृत्तसंस्था
मालदीवचे माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद हे बॉम्बहल्ल्यातून बचावले आहेत. माले येथील त्यांच्या घराबाहेरच झालेल्या एका बॉम्बस्फोटात ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही. या हल्ल्यामुळे मालदीवमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नशीद यांना दहशतवादी गटांकडून सातत्याने धमक्मया मिळत होत्या. ते सध्या मालदीवच्या संसदेचे अध्यक्ष आहेत. ते आपल्या कारमध्ये बसत असतानाच बॉम्बस्फोट घडवण्यात आला. स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार नशीद यांच्या कारजवळ एक मोटारसायकल ठेवण्यात आली होती. त्या मोटारसायकलवर हा घरगुती बनावटीचा बॉम्ब लावण्यात आला होता. जखमी झालेल्या नशीद यांना ताबडतोब उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती नशीद यांच्या मालदीव्हीयन डेमोक्रेटिक पार्टीच्या प्रवक्त्याने दिली आहे.









