सैन्याची भूमिका : वीर सैनिकांसाठी 6 शब्दांचा व्हावा वापर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशासाठी सर्वोच्च बलिदान करणाऱया वीर सैनिकांसाठी अनेकदा मार्टियर किंवा शहीद शब्दाचा वापर केला जातो, परंतु भारतीय सैन्याने या शब्दांचा वापर चुकीचा असल्याचे म्हटले आहे. सैन्य मुख्यालयाकडून सैन्याच्या सर्व कमांडना पाठविण्यात आलेल्या एका पत्रात यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.
2 फेब्रुवारी रोजी पाठविण्यात आलेल्या या पत्राचा विषय ‘मार्टियर शब्दाचा चुकीचा वापर’ असा आहे. सैन्य दलाचे काही अधिकारी आणि प्रसारमाध्यमे देखील देशासाठी बलिदान केलेल्या आमच्या सैनिकांसाठी मार्टियर (शहीद) शब्दाचा वापर करत असल्याचे आढळून आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
धर्म त्यागण्यास नकार दिल्याने मृत्यूदंड ठोठावण्यात आलेला किंवा एखादा व्यक्ती स्वतःच्या धार्मिक किंवा राजनयिक श्रद्धेसाठी मारला गेल्यास मार्टियर शब्द वापरण्यात येतो. याचमुळे भारतीय सैनिकांसाठी या शब्दाचा वापर योग्य नसल्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
भाषणात किंवा कुठेही वीर सैनिकांचा उल्लेख करण्यासाठी ठराविक शब्दांचाच वापर करण्यात यावा. यात ‘किल्ड इन ऍक्शन’, ‘लेड डाउन देयर लाइफ्स’ (सर्वस्व अर्पण केले), ‘सुप्रीम सॅक्रिफाइस फॉर नेशन’ (देशासाठी सर्वोच्च बलिदान), ‘फॉलन हीरोज’ (वीरगती प्राप्त), ‘इंडियन आर्मी ब्रेव्स’ (भारतीय सैन्याचे वीर), ‘फॉलन सोल्जर्स’ सामील असल्याचे पत्रात म्हटले गेले आहे.









