योग्य दिशा मिळाल्यास स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहणे शक्य : बचत गटाचा प्रसार देशभर : बँकांचा स्तुत्य पुढाकार
वार्ताहर /उचगाव
बेळगाव तालुक्मयामध्ये प्रत्येक गावात गल्लोगल्ली बचत गटांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र, विविध व्यवसाय चालविण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहण्यासाठी या गटांना योग्यवेळी मार्गदर्शनाची व दिशा देण्याची खऱया अर्थाने आजच्या घडीला गरज असल्याचे मत तज्ञ महिलांनी व्यक्त केले आहे.
बचत ही महिलांच्या रक्तातच भिनलेली आहे. मात्र, ती आतापर्यंत महिलांना ओळखता आली नाही. बाजारात गेलेली स्त्री आठवडय़ाचा संपूर्ण बाजार करून थोडे पैसे नकळत कुटुंबाच्या शिलकीत टाकत असते. हेच पैसे भविष्यात संसारात काही अडचणी आल्यास त्या सोडविण्यास स्वतःहून खर्च करते. बचत गटाचा प्रसार आज बघता बघता देशभर वाढताना दिसून येत आहे. यासाठी सर्व वर्गातील महिलांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
आर्थिक मदतीसाठी बँकांचा पुढाकार
बचत गट संकल्पना ही चांगली योजना आहे. या माध्यमातून महिला एकत्र येतात स्वतःचे सुख-दुःख समजावून घेऊन प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून येतात. महिलावर्गाला या निमित्ताने स्वतःचे व्यासपीठ मिळते आणि महिलावर्गातील सुप्त गुणांना वाव मिळून जातो. बचत गटाला आता आर्थिक मदत करण्यास बँकांनी पुढाकार घेतला आहे. कोणताही व्यवसाय करण्यास सवलत असते.
अल्प व्याजदराने कर्ज मंजूर करून घेताना त्यांना कोणत्याही प्रकारचे कागदी घोडे नाचवावे लागत नाहीत. एकमेकींच्या विश्वासावर हा संघ चालतो. मात्र, कुटुंब प्रमुखांची एक स्वाक्षरी त्यासाठी घ्यावी लागते. बचत गटाच्या माध्यमातून पैसे घेऊन खरंतर महिलावर्गाने स्वतःचा व्यवसाय उभारून उत्कर्ष करून दाखवावयास हवा.
महाराष्ट्राकडून बचत गटांची दखल
या व्यवसायाच्या माध्यमातून पैसे उभारून घेतलेल्या कर्जाची परतफेड करावयास हवी. महाराष्ट्रात बचत गटांची चळवळ सध्या मोठय़ा प्रमाणात फोफावली आहे. तेथील सरकारलासुद्धा याची दखल घ्यावी लागत आहे. त्या मानाने कर्नाटकात अजून बचत गटाने बाळसे धरले नाही. येथील महिला कर्ज घेतात. यातून काही महिला स्व-साहाय्य संघाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय करतात.
मात्र बऱयाच महिला घर संसार, संसारोपयोगी साहित्य, सोसायटीची थकीत कर्जे, शेती उद्योगासाठी पतीच्या व्यवसायात गुंतवितात. स्वतःहून कोणता व्यवसाय करताना दिसत नाहीत. बचत गटांच्या माध्यमातून कर्जाऊ रक्कम देणाऱया मार्गदर्शकांनी महिलावर्गाला उद्योग उभारण्याची कल्पना द्यावयास हवी, महिलावर्गाला स्वतंत्र व्यवसाय म्हणजे किराणा दुकान, दुग्ध व्यवसाय, शेळय़ा-मेंढय़ा पालन, दुग्ध व्यवसायासाठी जनावरे खरेदी, मेणबत्ती बनविणे, दिवे बनविणे, फराळाचे साहित्य तयार करणे, पापड, सांडगे, मसाला उद्योग, साबण बनविणे, अगरबत्ती बनविणे असे उद्योग चालविला येतात.
मार्गदर्शनाची नितांत गरज
महिलावर्गाला स्वतःचा घर संसार आणि शेतीची कामे सांभाळून फावल्या वेळेत व्यवसाय करण्यास सवलत आहे. मात्र, कोणता व्यवसाय करावा म्हणजे तो चांगल्याप्रकारे चालेल याचे मार्गदर्शन करण्याचा दुवा त्यांच्याजवळ नाही. त्यामुळे महिला गडबडून जातात. बँकेमधून कर्जाऊ रक्कम देणाऱयांनी महिलावर्गाला मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. बचत गटांच्या माध्यमातून शिवणक्लासचे प्रशिक्षण, पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम, ग्राम स्वच्छता अभियान, तळागाळातील शिकणाऱया मुलींना प्रोत्साहन धन, महिला दिन, महिला आरोग्य तपासणी शिबिर या मोहिमा राबविल्या जाताहेत. समाजातील महिलांना संघटित करण्याचा प्रयत्न बचत गटांच्या माध्यमातून सुरू आहे. याला महिलावर्गाची सकारात्मक जोड मिळायला हवी.
बचत गट मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत

एखाद्या व्यवसायाचे योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक मदतीसाठी शासनाने सहकार्य केले तर महिला निश्चितच शेती व्यवसायाशी पूरक व्यवसाय काढून स्वतःच्या कर्तबगारीवर व्यवसायात झेप घेऊन यशस्वी होवू शकतात. यासाठी सरकार अथवा सेवाभावी संस्थांनी व्यवसाय करण्यासाठी योग्य दिशा आणि मार्गदर्शन करावे.
-अलका लक्ष्मण हंडे
कुटिरोद्योग लोकप्रिय करून दाखवू

शहरासारख्या ठिकाणी सर्व सोयी आणि कारखानदारीतून गृहोपयोगी खाद्यपदार्थ तसेच इतर वस्तू बनविल्या जातात. मात्र, ग्रामीण भागात कुटिरोद्योगासाठी बँकांनी वेळेत कर्जपुरवठा केला तर घर, शेती आणि कुटुंबाचा भार सांभाळत निश्चितच एखादा व्यवसाय सुरू करून आर्थिक पाया मजबूत करू. ग्रामीण भागात तयार केलेल्या खाद्यपदार्थांना लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करू. मात्र, यासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहनाची गरज आहे.
-अर्चना परशराम पावशे
उद्योगासाठी पाठबळ मिळवून द्यावे

दुग्धव्यवसाय, मसाला, सांडगे, पापड, शेवया, अगरबत्ती, टेलरिंग, बेकरी अशा अनेक व्यवसायांतून महिला आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. सदर खात्यांनी अशा उद्योगांतून महिला रोज नवनवीन पदार्थ बनवायला लागल्या आणि असे पदार्थ दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाला गरजेचे आहेत. मात्र, ग्रामीण महिलांना गरज आहे ती योग्य मार्गदर्शन, आर्थिक मदत आणि यंत्रसामग्रीची. अशा सर्व गोष्टींची जुळवणूक करून दिली तर ग्रामीण भागातील महिला निश्चितच सर्व क्षेत्रात पुढे येण्यास मदत होईल. यासाठी शासनाने व इतर उद्योगधंदे, व्यवसाय करणाऱया उद्योगपतींनी महिलांना मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ मिळवून द्यावे.
-नंदा कल्लाप्पा पाटील









