ऑनलाईन टीम / ब्युनोस आयर्स (अर्जेंटिना) :
मार्क्सवादी क्रांतिकारक चे गवेरा यांचे बोसारिया येथील लहानपणीचे घर विक्रीसाठी खुले करण्यात आले आहे. 200 चौरस मीटर असलेल्या या घराची विक्री 4 लाख डॉलरला करण्यात येणार आहे.
गवेरा यांच्या या घराला आतापर्यंत अनेक घरमालक लाभले आहेत. मात्र, गवेराच्या वारसाला साजेसा सांस्कृतिक प्रकल्प सुरू करण्यास आतापर्यंचे घरमालक अपयशी ठरले. त्यानंतर ही इमारत विक्री करण्याचे ठरवण्यात आले. सध्याचे घरमालक हे फ्रान्सिस्को फॅरुगिया हे उद्योगपती आहेत.
अर्नेस्तो चे गवेरा यांचा जन्म 14 जून 1928 ला मध्यवर्गीय कुटुंबात अर्जेंटिनामध्ये झाला होता. ते व्यवसायाने डॉक्टर होते. अमेरिकेच्या वाढत्या शक्तीला 50 आणि 60 च्या दशकात आव्हान देणारा युवक अशी गवेरा यांची ओळख होती. 1955 ला 27 वर्षीय गवेरांची भेट फिडेल कॅस्ट्रो यांच्याशी झाली. क्युबामधल्या कॅस्ट्रो यांच्या जवळच्या तरुण क्रांतिकारकांमध्ये त्यांचा समावेश झाला.
क्रांतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे चे गवेरा वयाच्या 31 व्या वर्षी क्युबाच्या राष्ट्रीय बँकेचे अध्यक्ष आणि त्यानंतर क्युबाचे उद्योगमंत्री झाले. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 1964 ला ते क्युबाचे प्रतिनिधी म्हणून गेले होते. अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा चे गवेरांना शोधत होती. बोलिव्हियातल्या सैन्याच्या मदतीने त्यांनी चे गवेरांना पकडून 9 ऑक्टोबर 1967 साली त्यांची हत्या केली.