जूनमधील आकडेवारी जाहीर ः 1.55 लाख मारुतीच्या कार्सचा खप महत्त्वाचे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या जूनमध्ये भारतामधील ऑटोमोबाईल्स कंपन्यांच्या कार विक्रीला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याचे दिसून आहे. यामध्ये मारुती सुझुकी कंपनीने 1.55 लाख कार्सची विक्री एकटय़ा जूनमध्ये केली आहे, अशी माहिती समोर आली आहे. यासोबत इतर वाहन उद्योगातील कंपन्यांच्या विक्रीतही सकारात्मता दिसली आहे. किया मोटर्सच्या वाहन विक्रीने 60 टक्के वाढ नेंदवली आहे. दुसरीकडे मारुती सुझुकीने वार्षिक तत्त्वावर कार विक्रीमध्ये 5.7 टक्के विकास साधला आहे. दुसरीकडे एम. जी. मोटर्स कंपनीनेही जूनमध्ये 27 टक्के इतकी वाढीव विक्री नोंद केली आहे. मारुती सुझुकीने जून 2021 मध्ये 1 लाख 47 हजार वाहनांची विक्री केली होती. मे मध्ये यांच्या देशांतर्गत विक्रीमध्ये 1.2 टक्के वाढ झाली होती. म्हणजेच 1 लाख 32 हजार वाहनांची विक्री झाली होती. छोटय़ा मोटारींमध्ये अल्टो आणि एसप्रेसो या गाडय़ा विक्रीमध्ये आघाडीवर राहिल्या आहेत. यासह स्विफ्ट, सेलेरियो, इग्निस, बलेनो आणि डिझायर यांनाही ग्राहकांनी चांगली मागणी नोंदविल्याचे स्पष्ट झाले आहे.

टाटाच्या वाहन विक्रीत 78 टक्के वाढ
टाटा मोटर्सचीही वाहन विक्री जूनमध्ये लक्षणीय ठरली आहे. 78 टक्के वाढीसह गेल्या जूनमध्ये टाटा मोटर्सने 82,462 वाहनांची विक्री केली आहे. जून 2021 मध्ये हाच कार विक्रीचा आकडा 46,210 इतका होता. जून 2022 मध्ये देशांतर्गत विक्री 82 टक्के वाढून 79,606 इतकी झाली आहे. कंपनीच्या पॅसेंजर वाहनांच्या विक्रीमध्येही वार्षिक तत्त्वावर पाहता 87 टक्के वाढ दिसली आहे. किया इंडियाने याच महिन्यात 24,024 वाहनांची विक्री केली आहे. ही विक्री कंपनीची आतापर्यंतची सर्वाधिक मानली जात आहे. जून 2021 मध्ये 15,015 वाहनांची विक्री कंपनीने केली होती. पहिल्या सहा महिन्यामध्ये कंपनीने 1 लाख 21 हजार 808 वाहनांची एकंदर विक्री केली आहे. हा एक प्रकारचा विक्रमच मानला जात आहे.









