मालवण / प्रतिनिधी-
आचरा बंदर येथे अनधिकृत मासेमारी वर कारवाई करण्यास गेलेल्या मत्स्य अधिकारी आणि सागरी सुरक्षा रक्षक यास शुक्रवार दि.२१ जानेवारी रोजी रात्री ११.३० वा बंदर जेटीवर बेदम मारहाण करण्यात आल्याचे निदर्शनास आलेले आहे.सदरची मारहाण ही अनधिकृत पर्ससीन आणि एलईडी मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांनी केल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.संबंधित विषयात आज पर्यंत कोणतीही तक्रार दाखल झाली नाही.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आद.पालकमंत्री हे अनधिकृत पर्ससीन मासेमारी करणाऱ्या गटाचे उघड पणे समर्थक आहेत.त्यांच्याच आशीर्वादामुळे आणि राजकीय पाठींब्या मुळे मत्स्यविभागतील सरकारी कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्याचे धारिष्ट्य सदरचे मच्छीमाफिया दाखवु शकतात का?.बेदम मारहाण झालेली असून सरकारी दबाव आणून मत्स्य अधिकारी यांनी तक्रार दाखल करू नये यासाठी पण दबाव आणला जात आहे का?असे प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी .जिल्ह्याधिकारी, मा.पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन मागणी करणार आहोत.तसेच मा.मत्स्य विकास मंत्री यांना पण यामध्ये गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंती करणार आहोत, अशी माहिती रविकिरण नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य चिंतामणी तोरसकर यांनी दिली.









