प्रतिनिधी/ बेळगाव
घराजवळ वाळत घातलेल्या शेणींवरून जनावरे गेल्याने याचा जाब विचारल्यानंतर मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या चलवेनहट्टी, ता. बेळगाव येथील युवकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी काकती पोलीस स्थानकात खून प्रकरण नोंदविण्यात आले आहे.
टोपाण्णा शिवाजी पाटील (वय 32) रा. चलवेनहट्टी असे खून झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव असून या प्रकरणी काकती पोलीस स्थानकात भादंवि 302 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 1 फेब्रुवारी रोजी चलवेनहट्टी येथे मारहाणीची ही घटना घडली होती. काकती पोलीस स्थानकात मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
टोपाण्णाचा केवळ सहा महिन्यांपूर्वी केदनूर येथील तरुणीशी विवाह झाला होता. चलवेनहट्टी येथील शिवाजी टोपाण्णा पाटील व मारुती बाळू किटवाडकर यांची घरे आजूबाजूला आहेत. शिवाजी पाटील यांची जनावरे मारुती किटवाडकर यांच्या घराजवळ वाळत घातलेल्या शेणींवरून तुडवत गेल्याने दोन कुटुंबात वाद होऊन मारहाणीची घटना घडली होती.
मारुती बाळू किटवाडकर (वय 70), त्याची पत्नी, मुले जोतिबा (वय 30) व सागर (वय 35) आदींनी शिवाजी पाटील व त्यांचा मुलगा टोपाण्णा पाटील यांना मारहाण केली होती. या प्रकरणी परस्परांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली होती. टोपाण्णा शिवाजी पाटील (वय 32) या युवकाच्या डोक्मयाला जबर दुखापत झाल्यामुळे त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला आहे.
काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर, उपनिरीक्षक अविनाश यारगोप्प व त्यांच्या सहकाऱयांनी या प्रकरणी मारुती, त्याची मुले जोतिबा व सागर या तिघा जणांना अटक केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.









