(अध्याय तिसरा)
आपले जीवन हा मायेचा खेळ असून ज्याने भगवंताची साथ सोडली किंवा त्याचे कर्तेपण अमान्य केले त्याचा पुरता बीमोड केल्याशिवाय ही माया रहात नाही.
आपल्या शरीराची जडण घडण भगवंतानी कशी केलेली आहे, त्यातल्या जीवात्म्याबरोबर भगवंत कसा वास करून आहेत हे सर्व आपण बघितले.
आपल्या अंतःकरणाचे चार भाग असून त्यातल्या चित्तात भगवंत ठेवा म्हणजे मनात त्याचेच सारखे विचार येतील आणि त्याप्रमाणे बुद्धी इंद्रियांच्याकडून त्याला अनुरूप असे कार्य करून घेईल असे नाथमहाराजांनी सांगितले आहे. पण बऱयाच वेल आपण ठरवतो एक आणि आपल्या हातून घडते भलतेच! याचे कारण माया. ही एक भगवंताची लीलाच होय आणि ही लीला त्याने अशासाठी रचली आहे की, ही एक प्रकारची आपली परीक्षाच आहे. भगवंत पाहत आहेत की त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण वागतो की नाही, त्यांच्या सांगण्यावर आपला विश्वास आहे की नाही, कारण माया ही मुलत भ्रम आणि मोहाची जननी आहे.
साहजिकच माणूस ‘चला कोण बघत नाहीये ना, मग चालतंय’ असे म्हणून बरीच गैरकृत्ये बिनदिक्कत करत असतो. पण देव बघत असतो, ‘देवाच्या काठीचा आवाज होत नाही’ असे म्हणतात ते अगदी बरोबर आहे.
माणसाला आपल्या तालावर नाचायला लावणारी माया बाजूला करून आपल्याला हा भवसागर पार करून जायचे आहे तर त्यासाठी काय उपाय असे जनक महाराज पुढे विचारतात. ते म्हणाले, माया दुस्तर आहे हे लक्षात आले. आता जे कोणी भोळे, भाबडे, मंद बुद्धीचे लोक भवसागर तरून जाण्याची इच्छा बाळगतात, त्यांच्यासाठी काही उपाय सांगा अशी विनंती. असा प्रश्न विचारणे हा खरं तर जनक महाराजांचा मोठेपणा आहे. कारण जनकराजा स्वतः विदेही आहेत. विदेही म्हणजे असा भक्त जो देहभान विसरून भक्ती करत असतो. त्यामुळे त्याची नेहमीची कामे स्वतः भगवंत करत असतात. तेव्हा राजाला भगवंताच्या मायेची अजिबात फिकीर नव्हती. पण प्रजेच्या कल्याणासाठी राजा स्वतः प्रश्न विचारतो तेव्हा त्या गोष्टीचे महत्त्व अधिकच वाढते आणि प्रजाजन राजावरील भक्तीने आणखीन कसोशीने जाणकारांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करतात. येथे जनक महाराज आपला राजधर्म अत्यंत दक्षतेने पाळत आहेत. ते स्वतः तर उद्धरलेले होतेच, पण फक्त स्वतःपुरते न बघता आपल्या प्रजेचाही उद्धार व्हावा ही व्यापक दृष्टी त्यामागे होती. गुरु आणि ब्रह्म एक आहेत अशा अभेद भावाने जे भक्ती करतील ते माया तरून जातील. असे अर्षभ कवी यांनी यापूर्वी सांगितले आहेच. जनक राजा स्वतः विदेही आहे, म्हणून ही चर्चा हा एकप्रकारे दोन विद्वानातला परिसंवाद आहे आणि भागवतकारानी खास आपल्यासाठी तो आयोजित केलेला आहे.
चला तर मग बघूया या दुस्तर मायेचा आपल्यातील आणि भगवंतातील पातळ पडदा कसा दूर करता येईल, कारण पडद्याच्या पलीकडे आपल्या स्वागतासाठी भगवंत स्वतः उभे आहेत.
क्रमशः







