नवी दिल्ली :
रेमडेसिविरचे जेनेरिक औषध बाजारात सादर करण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती मायलॅन एनव्ही या कंपनीने सोमवारी दिली आहे. कोविड-19 च्या उपचारासाठी सर्वप्रथ गिलिड सायन्सेसने रेमडेसिविर औषध सादर केले आहे. तर जेनेरिक औषधाला मंजुरी मिळाल्याने ते भारतात 100 एमजीच्या बाटलीकरता 4,800 रुपयांना विकले जाणार असल्याचे मायलॅन एनव्ही कंपनीने सांगितले आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) मायलॅन एनव्हीच्या रेमडेसिविर औषधाला मंजुरी दिली आहे. कंपनीने या औषधाचे ब्रँड नाव डेसेम ठेवले आहे. कोविड-19 बाधितांवर आपत्कालीन स्थितीत या औषधाचा वापर करता येणार आहे. यापूर्वी दोन भारतीय कंपन्यांनी रेमडेसिविरची जेनेरिक आवृत्ती सादर केली आहे. मायलॅन आता देशातील तिसरी कंपनी ठरली आहे. मायलॅनपूर्वी सिप्ला लिमिटेड आणि हेटेरो लास लिमिटेडने हे औषध सादर केले होते. सिप्लाने सिप्रिमी नावाचे औषध 5 हजार रुपये तर हेटेरोने कोविफॉर औषध 5,400 रुपयांना उपलब्ध केले आहे.









