प्रतिनिधी/ मायणी
येथील ब्रिटिशकालीन तलावात टेंभू योजनेचे पाणी सोडल्याने दोन दिवसांपासून तलाव ओव्हरफ्लो झाला असून अनेक वर्षापासून पर्जन्यमानाअभावी कोरडा पडणारा हा तलाव गेली दोन वर्षी सप्टेंबर, नोव्हेंबरमध्ये चांगल्या पावसामुळे ओसंडून वाहत होता. यंदाचे आश्चर्य म्हणजे डॉ. दिलीपराव येळगावकर व युवानेते सचिन गुदगे यांच्या प्रयत्नातून मायणीसह 16 गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाऱया टेंभु योजना पूर्णत्वास जाऊन प्रत्येक्ष तलावात पाणी आल्याने मायणीचा हा ऐतिहासिक तलाव जूनच्या पहिल्या आठवडय़ातच ओव्हरफ्लो झाल्याने भागातील आनंदाचे वातावरण पसरले आहे.
खटाव तालुक्यातील मायणी हे राजकारणाचे हायहोल्टेज गावातील माजी आमदार भाऊसाहेब गुदगे यांच्या चार टर्म आणि पाण्याच्या नळापासून आपल्या आक्रमक राजकारणाची सुरुवात करणाऱया डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी आपआपल्या आमदारकीच्या काळात आणि आजअखेर उरमोडी, तारळी, जिहे-कठापुर, टेंभू योजनांच्या पूर्णत्वासाठी आपली लढाई चालू ठेवली असून यात खटाव माण या तालुक्यांसाठीच्या तारळी, उरमोडी या योजना पूर्णत्वास गेल्या असून जिहे कठापुर ही लवकरच पूर्णत्वास जाईल अशी आशा आहे.
या सर्वात भौगोलिकदृष्टय़ा सिंचन योजनेचे पाणी न जाणाऱया सोळा गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्याकडे मायणीसह सोळा गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी मायणी ब्रिटिशकालीन तलावात टेंभु योजनेचे पाणी सोडण्याची मागणी माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर व युवानेते सचिन गुदगे यांनी वेळोवेळी बैठका घेत केली. या दुष्काळी भागातील गावांची तहान भागावणाऱया या योजनेला प्रशासकीय मान्यता देत या योजनेचे भूमिपूजन 19 सप्टेंबर 2019 रोजी करण्यात आले होते.
गेली दोन वर्षे या योजनेसाठी सांगली जिह्यातील नेते, अधिकाऱयांच्या संपर्कात राहत भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी अनेक तांत्रिक, राजकीय अडथळ्यांना पार करीत डॉ. येळगावकर या योजनेचे पाणी मायणी तलावात आणण्यात यशस्वी झाले.
योजनेचा आपल्या वचननाम्यात ठळक समावेश करीत मायणी ग्रामपंचायतीत परिवर्तन करत प्रथमच डॉ. येळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तेत आलेल्या सचिन गुदगे यांना टेंभु योजना मार्गी लागल्याने व या पाण्याने मायणी तलाव ओसांडल्याने लोकांना दिलेले वचन पाळल्याचे नक्कीच समाधान होणार आहे.









