वार्ताहर/ मायणी
येथील भरपेठत असलेले सराफी दुकान अज्ञात चोरटय़ांनी फोडून त्यातील सुमारे दोन लाखाच्यावर किमतीच्या सोन्या चांदीच्या दागिण्यांवर डल्ला मारल्याची घटना मायणी येथे घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सदर दुकानचे मालक भीमराव शंकर पवार यांनी याबाबत मायणी पोलीस दूरक्षेत्रामध्ये तक्रार केली आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती पुढीलप्रमाणे- भीमराव शंकर पवार (रा. मायणी) यांचे मायणी येथील मुख्य बाजारपेठेत महालक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. दि. 14 रोजी रात्री दुकान बंद करून गेल्यानंतर दि. 15 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास भीमराव पवार हे आपले दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकानाचे छतास असलेले पीओपी केलेली सिलिंग तोडून पीओपीचे वरचे बाजूस दुकानाचे छतास असलेला पत्रा कापून चोरटय़ाने दुकानात प्रवेश केल्याचे आढळून आले. चोरटय़ांनी दुकानातील काचेच्या काउंटरमधील चांदीचे व सोन्याचे दागिने, तसेच भिंतीवर लावलेल्या काचेच्या कपाटातील चांदीच्या वस्तू पळविल्या आहेत.
दुकानाच्या बाजूस असलेले लाकडी दरवाजे कशानेतरी उचकटून काढलेले होते. मात्र सोन्याचे व चांदीचे दागिने असलेल्या तिजोरीस चोरटय़ाने हात लावला नाही. चोरटय़ाने चांदीचे पैंजण, अंगठय़ा, मूर्तीवर चांदीचे पूजेचे साहित्य असे दोन किलो वजन वजनाचे चांदीचे दागिने अंदाजे किंमत रुपये एक लाख व तीस ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चमक्या अंदाजे किंमत एक लाख वीस हजार असे एकूण दोन लाख वीस हजार रुपयांचे दागिने पळवून नेले आहेत.
दरम्यान, सातारा येथून श्वानपथक मागविण्यात आले होते. मात्र श्वान पथकास शोध लावण्यास यश मिळाले नाही. त्याचप्रमाणे ठसे तज्ञांनाही बोलाविण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास मायणी पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस उपनिरीक्षक शितल पालेकर करत आहे.








