वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत मायक्रोसॉफ्ट इंडिया ही नोकरी देण्यात सर्वात लोकप्रिय कंपनी असल्याचे रॅनस्टॅड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्चच्या पाहणीत आढळून आले आहे. त्यांच्या यादीत नोकरीसंदर्भात विश्वासार्हता कायम राखण्यात मायक्रोसॉफ्टनंतर सॅमसंग इंडिया आणि ऍमेझॉन इंडिया यांचा नंबर लागतो.
मायक्रोसॉफ्ट इंडियाने सर्वच बाबतीत प्रगती साधली आहे. उत्तम आर्थिक क्षमता, उत्तम प्रतिष्ठा आणि तंत्रज्ञानाच्या वापरातही अग्रेसर असण्यात ही कंपनी सर्वांपेक्षा वरचढ ठरली आहे. यासंदर्भात पाहणीसाठी रॅनस्टॅडने 33 देशांतून 6 हजार 136 कंपन्यांबाबत 1 लाख 85 हजार जणांकडून मते आजमावली होती. या मतांच्या निकषावर त्यांनी केलेल्या यादीत मायक्रोसॉफ्ट इंडिया अग्रेसर ठरली आहे.
कर्मचाऱयांना आकर्षक वेतन आणि नोकरीची सुरक्षितता याबाबतीतही मायक्रोसॉफ्ट आघाडीवर राहिली आहे. 2019 मध्ये या यादीत ऍमेझॉनने प्रथम स्थान पटकावले होते. तर मायक्रोसॉफ्ट आणि सोनी यांनी अनुक्रमे, दुसरा, तिसरा क्रमांक पटकावला होता. मर्सीडीझ बेंझ व आयबीएम यांनी चौथे, पाचवे स्थान पटकावले होते. जवळपास 40 टक्के पुरूष उमेदवारांनी मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणे अधिक सुरक्षित असल्याचे मत नोंदवले आहे. पाहणीत 38 टक्के जणांना कंपन्यांकडून चांगल्या प्रशिक्षणाची अपेक्षा अधिक आहे तर 34 टक्के जणांनी दूरगामी विचार करण्यासोबत नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. 46 टक्के जणांनी कर्मचाऱयांनी काम आणि जीवन यांचा ताळमेळ योग्य साधणे गरजेचे असल्याचे सांगून कंपन्यांनीही ही बाब लक्षात घ्यायला हवी असल्याचे मत नोंदवले आहे.









