आज होणार दफनविधी
प्रतिनिधी/ मडगाव
फातोर्डा मतदारसंघाचे माजी आमदार व माजी वनमंत्री लुईस आलेक्स कार्दोज यांचे काल शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. संपूर्ण फातोर्डा मतदारसंघात तसेच गोव्यात ते मामा कार्दोज म्हणून ओळखले जायचे. आज रविवारी मडगावच्या होली स्पिरीट चर्चच्या दफनभूमीत दफनविधी होणार आहेत.
त्यांच्या पश्च्यात पूत्र ः टिटो कार्दोज (मडगाव पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष), तीन मुली, स्नुषा, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
मामा कार्दोज हे 1989 साली सर्वप्रथम गोवा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले आणि मार्च 1990 ते डिसेंबर 1990 पर्यंत त्यांनी वनमंत्री म्हणून पुलोआ सरकारात काम केले. 1994 आणि 1999 च्या विधानसभेत ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. तिन्ही वेळा त्यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली होती. आमदार म्हणून निवडून येण्यापूर्वी ते मडगाव नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. मामा कार्दोज हे मूळ राय गावचे, ते सिव्हिल कॉन्ट्रक्टर म्हणून कार्यरत होते. एसटी समाजाच्या उन्नतीसाठीही त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
मुख्यमंत्र्याच्या हस्ते झाला होता सत्कार
फातोर्डा मतदारसंघात गेल्या काही दिवसामागे एसटी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या कार्याची विशेष दखल घेऊन सत्कार केला होता. याच मेळाव्यात एसटी समाजातील विविध मान्यवरांना ही गौरविण्यात आले होते.
ज्येष्ठ नेते, सालस व्यक्तीमत्वास हरपलो ः मुख्यमंत्री
मामा कार्दोज यांच्या निधनावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुःख व्यक्त केले आहे. एसटी समाजाचे एक ज्येष्ठ नेते तसेच सालस व्यक्तीमत्व गेल्याने आपल्याला दुःख होत असून आपण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याची प्रतिक्रिया डॉ. सावंत यांनी व्यक्त केली आहे.
म्ाामांच्या कुटुंबीयांप्रती संवेदन ः श्रीपाद नाईक
केंद्रीय आयुष्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी देखील मामा कार्दोज यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. मामाचे कुटुंबीय तसेच मित्र परिवाराप्रति मनपूर्वक संवेदना व्यक्त केल्या आहेत.
माम कार्दोज यांना गुडबाय ः कामत
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे, माझे जीवलग मित्र माम कार्दोज यांना गुडबाय, मी व माझ्या कुटुंबियांना त्यांची उणीव सदैव भासणार. त्यांच्या निधनाने मला तीव्र दुःख झाले. एसटी समुदयासाठी त्यांचे योगदान खुप मोठे आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. देव त्यांच्या आत्म्यांस शांती देवो.
फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक यांनी म्हटले आहे की, फातोर्डावासियाचे लाडके नेते, माजी वनमंत्री आणि माजी आमदार लुईस आलेक्स कार्दोज (मामा) यांच्या निधनाने मला दुःख झाले आहे.
गोवा विधानसभेत तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले माजी मंत्री लुईस (मामा) आलेक्स कार्दोज यांच्या निधनाने आपल्याला दुःख झाले, त्यांनी नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या हिताचे समर्थन केले. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना अशी प्रतिक्रीया माजी खा. नरेंद्र सावईकर यांनी व्यक्त केली आहे.
आमचे लाडके एसटी नेते आणि 3 वेळा फातोर्डाचे आमदार आणि मंत्री लुईस (मामा) कार्दोज यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे. असे, आमदार विजय सरदेसाई म्हणाले.









