अर्ध्या महाराष्ट्रातून मान्सून परतला
पुणे / प्रतिनिधी
नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने महाराष्ट्राच्या अर्ध्या भागातून सोमवारी माघार घेतली असून, पुढील दोन दिवसांत तो संपूर्ण देशातून माघारी फिरेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तविला.
देशाच्या वायव्य भागातून परतीच्या मान्सूनचा 28 सप्टेंबरला प्रवास सुरू झाला. मध्यंतरी कमी दाबाच्या क्षेत्रामुळे त्याचा प्रवास खोळंबला होता. मात्र, पुन्हा त्याला वेग मिळाला. त्याने पश्चिम बंगाल, ओरिसाचा काही भाग, झारखंडचा बहुतांश भाग, छत्तीसगडचा उर्वरित भाग, आंध्र किनारपट्टी, तेलंगणाचा काही भाग तसेच संपूर्ण विदर्भ, मध्य प्रदेशचा उर्वरित भाग, त्याचबरोबर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ाचा काही भाग, गुजरातचा उर्वरित भाग आणि उत्तर अरबी समुद्रातून मान्सून माघारी फिरला आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून संपूर्ण देशातून माघारी फिरेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
ईशान्य मोसमी पावसाचे दोन दिवसांत आगमन
दरम्यान, दोन दिवसांनंतर ईशान्य मोसमी पावसाचे दक्षिणेकडील भागात आगमन होण्याचा अंदाज आहे. हा पाऊस दक्षिणेकडील राज्यांसाठी फायदेशीर ठरतो. यामुळे तामिळनाडू, पाँडेचरी, आंध्र किनारपट्टी, कर्नाटक, केरळात दोन दिवसांनंतर पावसाचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात कोरडे हवामान
दरम्यान, महाराष्ट्रात बुधवारनंतर कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील तीन ते चार दिवसांत देशाच्या वायव्य भागात किमान तापमान दोन ते तीन अंशांनी घटण्याचा अंदाज आहे. यामुळे थंडीच्या आगमनासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे.








