ऑनलाईन टीम / पुणे :
केरळच्या टप्प्यानंतर गुरुवारी मान्सून कर्नाटकात दाखल झाला. कर्नाटकात कारवार, हसनपर्यंत मान्सूनने मजल मारली असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
1 जूनला मान्सून केरळात दाखल झाला. गुरुवारपर्यंत त्याने मध्य अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण केरळ, महे, दक्षिण बंगालचा उपसागर, पूर्व मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असून, येत्या 2 ते 3 दिवसांत तो मध्य अरबी समुद्र, कर्नाटकचा उर्वरित भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, पाँडेचेरी, संपूर्ण दक्षिणपूर्व बंगालचा उपसागर, पश्चिममध्य बंगालच्या उपसागरात दाखल होईल, असे हवामान विभागाने सांगितले आहे.









