गोव्यात मान्सूनपूर्व पावसाची मान्यता
प्रतिनिधी / पणजी
अखेर केरळमध्ये मान्सूनने सलामी दिली. मान्सूनने केरळमध्ये शनिवारी प्रवेश केल्यानंतर सर्वत्र जोरदार पाऊस झाला. गोव्यात दि. 4 वा 5 जूनपासून मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. तथापि, आज राज्यात मान्सूनपूर्व पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.
भारतीय हवामान खात्याने सायंकाळी जारी केलेल्या पत्रकानुसार मान्सून केरळमध्ये पोहोचला. केरळपासून तो पुढील 4 दिवसात गोव्यात पोहोचू शकतो. केरळमध्ये मान्सून कितपत सक्रिय राहिल यावर हे अवलंबून आहे. अरबी समुद्रात मात्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. त्याचा गोव्यावर परिणाम होईल व त्यातून जोरदार वारे वाहतील त्याचबरोबर राज्यात आज व उद्या पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. सध्या उकाडय़ाने जनता हैराण झाली असून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. राज्यात आज सर्वत्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे.









