पुणे / प्रतिनिधी
गेली चार महिने देशात मुक्कामी असलेला आणि आनंदसरी देणाऱया मान्सूनचा परतीचा प्रवास सोमवारपासून सुरू झाला. पश्चिम राजस्थान तसेच पंजाबच्या काही भागातून तो माघारी फिरल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आली.
यंदा 1 जूनला भारतात दाखल झालेल्या नैत्य मोसमी पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावली आहे. देशभरात 28 सप्टेंबरपर्यंत 9 टक्के अधिक पाऊस झाला असून, आता दुष्काळाची चिंता मिटली आहे. रिटर्न मान्सूनची रेखा सध्या अमृतसर, भटिंडा, हनुमानगड, बिकानेर, जैसलमेर अशी आहे. गेले चार ते पाच दिवस पश्चिम राजस्थानच्या वातावरणाच्या खालच्या स्तरात अँटी सायक्लोन स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे वातावरणातील बाष्प तसेच पाऊस कमी झाला आहे. यावरून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. गेल्या वर्षी 9 ऑक्टोबरला मान्सूनच्या माघारीस सुरुवात झाली होते.
माघारीसाठी अनुकूल स्थिती
दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सूनच्या माघारीसाठी अनुकूल स्थिती असून, राजस्थान, पंजाबचा आणखी काही भाग, हरियाणा, चंदीगड, दिल्ली तसेच मध्य प्रदेशच्या भागातून तो परतेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.








