लांबणीवरील आमसभा आटोपली खरी…तरीही गुंता कायम
प्रतिनिधी / फोंडा
गोवा राज्य सहकारी दुध उत्पादक संघ म्हणजेच गोवा डेअरीची लांबवणीवर टाकण्यात आलेली आमसभा अखेर काल शुक्रवारी केवळ मागील आमसभेत नेमण्यात आलेल्या तीन ऑडीटरपैकी एका ऑडीटराकडून फेरऑडीट करून घेण्यात यावे या एकमेव मुद्दयावर आमसभा गाजली. सन 2014 सालापासून डेअरी तोटय़ात जबाबदार असलेल्या सर्व घोटाळेखोरांची चौकशी व वसुली या ठरावाला मंजूरीसह आमसभा गुंडाळण्यात आली. आमसभेला 173 पैकी 110 दुध सोसायटींचे सदस्य उपस्थित होते.
सदर आमसभा त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्रिसदस्यीय समितीचे सदस्य सीए यशवंत कामत व सहाय्यक निबंधक अवित नाईक, कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक अनिल फडते उपस्थित होते. डेअरीचे ऑडीट करण्यासाठी सन 2018-19 रोजी झालेल्या आमसभेत पुढील वर्षाचे 2019-20 सालासाठी तीन ऑडीटर नेमण्यात आले होते. शेखर मराठे, रोहित कालभैरव, निशांत उपाध्ये यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र त्यानंतर ताबा घेतलेल्या व्यवस्थापकीय संचालक राधिका काळे यांनी सदरपैकी कोणाचीच नेमणूकीविषयी सहकार खात्याशी सोपस्कर पुर्ण पेले नसल्याने त्याजागी सहकार खात्याच्या पॅनलरवरील अन्य एक ऑडीटर लक्ष्मीकांत नाईक यांच्या नेमणूकीनंतर डेअरीचे ऑडीट करण्यात आल्याची माहिती शिरोडकर यांनी दिली.
मागील 17 जानेवारी रोजी तहकूब करण्यात आलेल्या आमसभा काल 12 फेब्रु. रोजी झाली. आमसभेत काही दुध उत्पादकांनी बेकायदेशीरित्या पद्धतीनुसार ऑडीट झाल्यामुळे आक्षेप घेतला, त्याऐवजी डेअरीच्या आमसभेत नेमलेल्या ऑडीटरपैकी एकाची नेमणूक करून त्याच्याकडून ऑडीट करून घ्यावे असा हट्ट धरल्यामुळेच गदारोळ मजला व आमसभेत अन्य विषयावरच चर्चा झालीच नाही.
आमसभा व ऑडीटरची फिचा भार साडे दहा लाख रूपये
डेअरीचे एका वर्षाचे ऑडीट करण्यासाठी सरासरी रू. 3 लाख खर्च अपेक्षित आहे. तसेच आमसभेसाठी सुमारे दीड लाख खर्च येत असतो. यंदा दोन वेळा आमसभा बोलाविण्यात आलेली आहे. तसेच आत्ता दुध उत्पादकांनी डेअरीचे फेरऑडीट त्यांनी नेमून दिलेल्या ऑडीटरकडून होणे असा तगादा लावल्याने अजून एक खास आमसभा व ऑडीटरचा खर्च मिळून साडेचार लाखांच वायफळ वाढणार आहे. तरीही त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांनी आपल्या कार्यकाळात सुमारे रू. 2 कोटी 40 लाख नफा यावर ते ठाम आहेत.
सद्यपरिस्थितीत डेअरीला रू.2कोटी 40 लाख नफा- शिरोडकर
माझ्या अध्यक्षतेखाली होत असलेली आमसभा ही पाच महिने संचालक मंडळ , दोन महिने विलास नाईक व पाच महिने प्रशासक अरविंद खुटकर यांच्या कार्यकाळातील असल्याची माहिती अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांनी दिली तसेच सद्यपरिस्थितीत आपल्या कार्यकाळात रू. 2.40 लाख नफा झाल्याचा मतावर ठाम राहिले. डेअरीला एप्रिल 2019 ते मार्च 2020 च्या आर्थिक वर्षात नुकसानी सहन करावी लागलेली आहे.
आमसभेत प्रत्येक सोसायटीच्या सदस्यासाठी निवडणूक लढविण्यासाठी सोसायटीतर्फे दिवसाकाठी 60 लिटर दुध संकलन किंवा वर्षाकाठी 25 हजार लिटर दुध डेअरीला पुरविणाऱया सोसायटीच्या अध्यक्षाला गोवा डेअरीच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक लढविण्यासाठी पात्र ठरेल असा ठराव घेण्याविषयी दुध उत्पादाकांनी विरोध दर्शविला. गायीचे दूध गोवा डेअरीतर्फे सर्वोच्च दरात घेतले जात असल्याचीही माहिती शिरोडकर यांनी दिली. डेअरीची आजच्या घडीला दुध विक्री सुमारे 59000 लिटर होत असून शेतकऱयाकडून दुध संकलन सुमारे 57000 लिटर होत असल्याची माहिती अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांनी दिली.
बेजबाबदार कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक -फळदेसाई
आमसभेच्या अजेंडावर डेअरीचे कायद्यात दुरूस्ती करण्यासंबंधी प्रश्न गायब करण्यात आल्याचा आरोप राजेश फळदेसाई यांनी केला. कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक अनिल फडते यांनी पशुसंवर्धन अधिकारी म्हणून काम करताना शेतकऱयाकडून पशुवैद्यकीय सेवेपोटी घेतलेले लाखो रूपये दुध संघाच्या कार्यालयात भरणा अजूनपर्यंत केलेली नाही व याबाबत तक्रार करूनही आजपर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.अशा बेजबाबदार अधिकाऱयाला डेअरीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून बसण्याचा कोणताच अधिकार नाही त्याची तात्काळ उचलबांगडी करावी अशी मागणी माजी अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी केली आहे.
सन 2014 सालापासून डेअरी नुकसानीसाठी जबाबदार असलेल्या सर्व घोटाळेखोराकडून नुकसानी वसूल करून घेण्यात यावी या महत्वपुर्ण ठरावाला मंजूरी देत आमसभा आटोपली घेण्यात आली. याची अंमलबजावणी झाल्यास आईसक्रिम प्रकल्प, फिल पॅक मशिन, बेकायदेशीर नोकरभरती, कमी दर्जाच्या माल घेणे, निविदा प्रक्रिया अशा अनेक प्रकरणात झालेल्या घोटाळेखोराचा पर्दाफाश होणार आहे. मान्यताप्राप्त ऑडीटरकडून डेअरीचे 2019-20 सालाचे ऑडीट करून घेतल्यानंतर बहुतेक परत एकदा खास आमसभा बोलावून ऑडीट सर्व सभासदासमोर मांडण्यात येणार असल्याचे संकेत त्रिसदस्यीय समितीने दिले आहे.









