धामोड / वार्ताहर
कोतेपैकी मानेवाडी येथे दुर्मिळ खैर लाकडाची विनापरवाना वहातूक करणारी मार्शल गाडी पकडून लाकडासह वाहन जप्त करण्यात आले. म्हासुर्ली वनविभागाने हि कारवाई गुरुवारी रात्री २ च्या सुमारास केली.
याबाबत समजलेली अधिक माहीती अशी कि, वैभववाडी परिसरातील टोळी स्थानिकांना खैर लाकडाच्या बदल्यात पैशाचे आमिष दाखवून लाकडाची कत्तल करतात. म्हासुर्ली – केळोशी बिट संरक्षित वनपरिसर असुनसुद्धा विनापरवाना लाकूडतोड व वहातूक करून वनविभागाच्या नियमांची पायमल्ली केली जाते ही खबर वन विभागाला आठवडाभरापूर्वी प्राप्त झाली होती.
त्यानुसार वनविभागाच्या पथकाने सापळा रचून गुरुवारी रात्री विनापरवाना खैर लाकडाची वहातूक करणारी महिंद्रा मार्शल गाडी क्र .एमएच -१३ एन -००१७ पकडली. त्यामध्ये बिगरपास खैर जळाऊ लाकूड १ घमी होते. वहान मालक लहू रामचंद्र माने ( रा.कोते पैकी मानेवाडी ) व लाकूड मालक रामचंद्र साईल ( रा.एनारी .ता. वैभववाडी ) यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ कलम ४१( २) अन्वये प्रथम गुन्हा रिपोर्ट क्र टी १/२०२१ वनरक्षक राशिवडे कु. उमा जाधव यांनी नोंदविला आहे. सदरची कारवाई म्हासुर्ली वनपाल आर एस तिवडे, वनरक्षक दिनेश टिपूगडे, शिवाजी कांबळे, जोतिराम कवडे, संतोष करपे यांचेसह उमा जाधव यांनी केली आहे. पुढील तपास राधानगरीचे वनक्षेत्रपाल एस बी बिरासदर यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल आर .एस. तिवडे करीत आहेत.









